भूमीअभिलेखचा पुन्हा एक लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : नाशिक भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयातील आणखी एक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जमिनीची मोजतात करून देण्याच्या बदल्यात भूमी अभिलेख विभागाचा प्रतिलिपी लिपिक निलेश कापसे या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे आधी अडीच लाख त्यानंतर ४० हजारांची मागणी केली. ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये व सदर नकाशावर शासकिय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे 50,000 याप्रमाणे दोरलाचेची मागणी भूमी अभिलेख विभागाचा प्रतिलिपी लिपिक निलेश कापसे याने केली होती. परंतु, तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देण्याची विनंती केली. त्यानुसार पुन्हा कापसे याने नव्याने प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना कापसे यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

महिन्याच्या सुरवातीलाच २ फेब्रुवारी रोजी भूमी अभिलेख विभागाचा उपसंचालक तथा जिल्हा अधीक्षक महेशकुमार महादेव शिंदे आणि कनिष्ठ लिपिक अमोल भीमराव महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी (दि.२७) पुन्हा एका अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. जमीनची मोजदाद करून दोन जागा मालकांच्या जमिनीतील खुणा निश्चिती करून देण्याच्या बदल्यात भूमी अभिलेख विभागाचा अधिकारी निलेश कापसे याने तक्रारदाराकडे सुरवातीला अडीच लाख आणि नंतर ४० हजारांची मागणी केली होती. यातील ४० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.

अवघ्या १५ दिवसापुर्वी भूमी अभिलेख विभागात दोघांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. तरीसुद्धा पुन्हा अजून एक अधिकारी त्याच कार्यालयात लाच स्वीकारताना जाळ्यात सापडला आहे. नेमकं भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात कसा कारभार सुरू आहे? या अधिकाऱ्यांवर कोणाचा वाचक आहे की नाही? असा प्रश्न आता, नागरिक उपस्थित करत आहेत.