Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 'आपला दवाखाना' सुरू; भविष्यात संख्या वाढणार

नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ‘आपला दवाखाना’ सुरू; भविष्यात संख्या वाढणार

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निरोगी महाराष्ट्राचा संकल्प सोडला असून यानिमित्ताने राज्यातील ‘प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना’ बाबत घोषणा केली होती. राज्य शासनाच्या धोरणानूसार नाशिक जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सोमवारी (दि.1 मे) महाराष्ट्र दिनी ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येत असून या दवाखान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.

राज्यातील दवाखाने आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविण्याच्या दिशेने राज्य शासनानेे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासंदर्भात शासनाने संकल्प सोडला आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून विविध रोगांच्या प्रादुर्भावांचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे सोपे होणार असून सुलभ व परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा दवाखान्याच्या माध्यमातून जिल्हावासियांना देण्यात येणार आहे. याचबरोबर शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी देखील आपला दवाखाना मार्फत सुविधा पुरविण्यात येणार आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, डेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भसेवा, गर्भवती मातांची तपासणी आणि लसीकरण या सुविधा देण्यात येणार आहे.

- Advertisement -

याचबरोबर गरजेनुसार फिजिशियन स्त्रीरोग, व प्रसुतीतज्ञ बालरोगतज्ञ, नेत्र रोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, नाक कान घसा तज्ञ इत्यादी सात प्रकारच्या तज्ञ सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपला दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी आणि मदतनीस इत्यादींची फौज रुग्णांच्या सेवेत असणार आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावरील रुग्णांचा अतिरिक्त ताण कमी करण्याच्या दृष्टीने आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यात शासकीय जागांवर आजपासून 15 दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाणार्‍या रुग्णांनी तालुकास्तरावरील ‘आपला दवाखाना’ च्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -