आडत वाचविण्यासाठी ‘रात्रीचे मार्केट’ बंद करण्याचा घाट

चोवीस तास चालणारे मार्केट ही नाशिक बाजार समितीची मागील ५० वर्षातील ओळख असून ती शेतकरी, व्यापारी व वाहतुकदारांना चांगलीच अंगवळणी पडली आहे. मात्र केवळ मुठभरांसाठी लाखो शेतकरी व इतर घटकांना सोयीची असलेली सोयीची असलेली व्यवस्था बाजार समितीच्या संचालकांनी मोडीत काढायचे ठरवले आहे.

APMC_Nashik_
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

चोवीस तास चालणारे मार्केट ही नाशिक बाजार समितीची मागील ५० वर्षातील ओळख असून ती शेतकरी, व्यापारी व वाहतुकदारांना चांगलीच अंगवळणी पडली आहे. मात्र केवळ मुठभरांसाठी लाखो शेतकरी व इतर घटकांना सोयीची असलेली सोयीची असलेली व्यवस्था बाजार समितीच्या संचालकांनी मोडीत काढायचे ठरवले आहे. सोमवार २५ फेब्रुवारीपासून नाशिक बाजार समिती रात्री ११ ते ४ बंद ठेवण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. ठराविक आडतदारांच्या हितासाठीच संचालकांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप होत शेतकरी नेत्यांनी केला असून शेतकर्‍यांमधूनही या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

चोवीस तास चालणारे मार्केट ही नाशिक बाजार समितीची राज्यात ओळख आहे. रात्रीच्या काळातही निम्म्या शेतमालाचा निपटारा होत असल्याने व व्यापार्‍यांनाही दूरवरच्या बाजारात माल पाठविणे सोयीचे असल्याने बाजार समितीत दररोज कोट्यवधीची उलाढाल होते. दिवसा पडणारा वाहतुकीवरील ताणही विभागला जातो. मागील ५ दशकांपासून ही व्यवस्था सुरु असतांना बाजार समितीच्या संचालकांनी रात्रीचे मार्केट बंद करण्याचा ठराव करुन ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचे ठरवले आहे. बाजार असुरक्षेचे कारण पुढे करुन रात्री ११ ते पहाटे ४ या वेळातील मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र रात्रीच्या व्यवहारांमुळे आडतदारांची दररोजची लाखो रुपयांची आडत बुडते. त्यामुळे काही आडत्यांच्या दबावानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

नाव शेतकर्‍यांचे; हित आडत्यांचे?

वास्तविक नाशिक बाजार समितीत रात्री होणार्‍या व्यवहारांना शेतकरी व व्यापार्‍यांचा प्रतिसाद वाढला आहे. रात्रीच्या दरम्यान होणार्‍या व्यवहारांत शेतकर्‍यांकडून आडत कापली जात नाही. बहुतांश शेतकर्‍यांना रोख पेमेंट मिळते. गुजरात, मध्यप्रदेश या भागात माल पाठविणारे व्यापारी बहुतांशवेळा रात्रीच्या दरम्यान नाशिक मार्केट कमिटीच्या आवारात येतात. रोख व्यवहार करुन आपल्या गाड्या लोड करतात. या स्थितीत दिवसा ५० टक्के तर रात्रीही ५० टक्के आवक नाशिक बाजार समितीत होते. दूरवरच्या बाजारात सकाळी लवकर माल पोहोचण्यासाठी रात्री होणारी शेतमालाची खरेदी उपयुक्त ठरते. असेही व्यापार्‍यांनी सांगितले. नाशिक बाजार समितीत दररोज नाशिकसह राज्यभरातून ४ ते ५ टन मालाची आवक होते व तितकाच माल देशभरात पाठवला जातो. यातून दररोज लाखो रुपयांची आडत मिळते. रात्रीच्या व्यवहारात आडतदारांचे व्यापारी अत्यंत कमी असतात. त्यामुळे बाजार समितीत माल येतो. मात्र त्याची आडत इथल्या आडतदारांना मिळत नाही. यातून आडतदारांची दररोजची लाखोंची कमाई बुडत असल्याने आडतदारांनी रात्रीच्या मार्केटला विरोध केला आहे. नाशिक बाजार समितीत ठराविक दहा ते बारा आडतदारांचे वर्चस्व आहे. आडतदारांनी बाजार समितीच्या संचालकांवर दबाव आणून रात्रीचे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांत रंगली होती.

वेळेची मर्यादा घालू नका, सुरक्षा यंत्रणा वाढवा

वर्षातील १२ महिने चोवीस तास सुरु असणारी बाजार समिती म्हणून नाशिक बाजार समिती ओळखली जाते. त्यामुळेच राज्यातील भाजीपाला व्यवहारात नाशिक ही सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. दूरवरुन येणार्‍या शेतकर्‍यांसाठी बाजार समितीचे वेळेचे बंधन गैरसोयीचे आहे. उशिराने येणार्‍या शेतकर्‍यांना थांबण्यासाठी बाजार समितीचे शेतकरी निवारागृह आहे. पण ते अगदीच नावापुरते. पाणी, शौचालय आणि स्वच्छतेच्या संदर्भात खूप गैरसोयी असल्याने शेतकरी तिथे जात नाहीत. वेळेचे बंधन केल्यास राज्यभरातून येणार्‍या गाड्यांची गर्दी ठराविक वेळी वाढेल. त्यातून वाहतुकीचे नियोजनही कोलमडेल यामुळे वेळेचे बंधन ठेवू नये असे शेतकरी व व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. काही प्रमाणात असुरक्षितता नेहमीच बाजारात असतांना बाजारात सुरक्षा वाढवावी अशीच मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आम्ही तीव्र आंदोलन करणार

नाशिक बाजार समिती ही पूर्णवेळ सुरु राहिली पाहिजे. ते शेतकरी, व्यापारी व वाहतूकदार यांच्या सोयीचे आहे. रात्रीच्या वेळी परराज्यात माल पाठवणारे व्यापारी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बाजारात स्पर्धा होवून चांगला दर मिळतो. शिवाय आडतही कापली जात नसल्याने रात्रीच्या मार्केटला शेतकर्‍यांचा प्रतिसाद वाढला आहे. यामुळेच एकाधिकारशाहीची सवय असलेल्या काही आडत्यांना ही स्पर्धा नको असल्याने त्यांनी दबाव आणून रात्रीचे मार्केट बंद करण्याचा घाट घातला आहे. नाशिक मार्केट हे पूर्णवेळ सुरु राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. – हंसराज वडघुले, शेतकरी नेते व संचालक, नाशिक बाजार समिती.

सुरक्षिततेसाठीच निर्णय

नाशिक बाजार समितीच्या संचालकांनी बाजाराच्या सुरक्षिततेसाठीच रात्रीचे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत शेतकरी तसेच कुणालाही तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. – रामेंद्र जोशी, सचिव, नाशिक बाजार समिती.

रात्रीचे व्यवहार बंद ठेवणे हाच उपाय

नाशिक बाजार आवारात रात्री चोर्‍या, लूट तसेच गैरप्रकारांचे प्रमाण जास्त असते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीचे व्यवहार बंद ठेवणे हा उपाय आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. – चंद्रकांत निकम, आडतदार व संचालक, नाशिक बाजार समिती