‘एनडीएसटी’च्या चौकशीसाठी समिती नियुक्त करा

शिक्षकांचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांना निवेदन; लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासही दिली माहिती

नाशिक : शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्याच्या मोबदल्यात 19 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी ‘एनडीएसटी’चे दोन व्यवस्थापक गजाआड गेले आहेत. या संस्थेची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांना निवेदन दिले. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेवून त्यांना संस्थेच्या कारभाराविषयी अधिक माहिती दिल्याने आता या घटनेने राजकीय स्वरुप धारण केले आहे.
जिल्हातील माध्यमिक शिक्षकांची सर्वात मोठी पतसंस्था म्हणून नाशिक डिस्ट्रीक्ट सेकंडरी टीचर्स क्रेडीट सोसायटीचा (एनडीएसटी) नावलौकिक आहे. या संस्थेच्या माजी पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.11) जिल्हा उपनिबंधक बलसाने यांची भेट घेवून त्यांच्याकडे संचालक मंडळाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे आश्वासन बलसाने यांनी दिल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. यानंतर ‘एसीबी’च्या कार्यालयात जावून त्यांना बाहेर सुरु असलेल्या चर्चांची माहिती दिली. ‘आम्ही पैसे भरून सर्व प्रकरण मिटवू’ अशी वल्गना संचालक करत असल्याचे एसीबीच्या अधिकार्‍यांना सांगितले.
यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची भेट घेतली. जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या, विविध प्रश्नांवर त्यांच्या सोबत चर्चा केली. गेल्या सहा महिन्यापासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रस्ताव कार्यालयात प्रलंबित आहेत. पदोन्नतीचे तसेच वैयक्तिक मान्यता सेवानिवृत्त यांच्या प्रस्तावाबाबत प्रचंड अनागोंदी कामकाज सुरू आहे. या सर्व बाबींच्या बाबतीत आठ दिवसात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही सांगितले. याप्रसंगी एनडीएसटी सोसायटीचे माजी चेअरमन आर. डी. निकम, माजी कार्यवाह साहेबराव कुटे, जेष्ठ नेते के. के. आहिरे, संग्राम करंजकर, एस. बी. शिरसाठ, पुरुषत्तोम रकिबे, दशरथ जारास, अरुण आहेर, निलेश ठाकूर, यशवंत ठोके, सुभाष भामरे, त्र्यंबक मार्तण्ड, हेमंत पाटील, संजय पाटील, बी. बी. निकम, जयेश सावंत, आशिष पवार, सखाराम जाधव, अनिल रौंदळ, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

गेल्या साडेतीन वर्षांपासून संस्थेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचाराचा जणू खेळ संचालकांनी मांडलेला आहे. संडास बांधकाम, येवल्याची शाखा खरेदी, निफाडची शाखा दुरुस्ती, खुर्च्या खरेदी,स्टेशनरी, कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याच्या फरकाची वाढ देणे व त्या स्वतःच्या घशात घालणे या सर्वांची सखोल चौकशी व्हायला हवी.
-आर. डी. निकम, अध्यक्ष (टीडीएफ, संघटना)