वीर जवान सचिन चिकणे यांना अखेरचा निरोप

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वीर जवान सचिन चिकणे यांचे कर्तव्यावर असताना दुर्दैवी निधन

Army Jawan

शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार शहरातील सह्याद्रीनगर (पंढरपूरवाडी) येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वीर जवान सचिन चिकणे यांचे काल कर्तव्यावर असताना दुर्दैवी निधन झाले. वीर त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या मूळगावी इगतपुरी येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी प्रथमतः वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवास केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर सचिन यांचे पार्थिव घरी आणल्यावर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण चालत होते. सह्याद्रीनगर व परिसरातून अंत्ययात्रा येथील गांधी चौक, हुतात्मा स्मारक येथे आली असता नागरिकांनी वीर जवान सचिन चिकणे अमर रहेच्या घोषणा दिल्या. नंतर अंत्ययात्रा इगतपुरी येथील अमरधाम येथे पोहोचली. त्यानंतर त्यांना पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे मोठे बंधू सुनील चिकणे यांनी अग्नी डाग दिला.

वीर जवान सचिन चिकणे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे रमेश वर्मा, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस निरीक्षक वसंत पाथरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील, इन्स्पेक्टर अनिकेत कुलकर्णी, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, मुख्याधिकारी पंकज गोसावी, मंडल अधिकारी नानासाहेब बनसोडे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, लांस नायक विजय कातोरे किरण फलटणकर आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.