अटक केल्याने सराफ व्यावसायिकाची आत्महत्या; हैदराबाद पोलिसांची संशयास्पद कारवाई

नाशिक शासकीय विश्रामगृहातील चौथ्या मजल्यावरुन विजय बिरारी यांनी उडी मारुन आत्महत्या केली.

नाशिक : चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्याकडून घेतल्याच्या संशयावरुन हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी (दि.२५) नाशिकमधील सराफ व्यावसायिकास अटक केली. पोलिसांची नजर चुकवत सराफ व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शासकीय विश्रामगृह येथे घडली. एन्काउंटरमध्ये चौघांना मारुन देशभर चर्चेत आलेेल्या स्मार्ट हैदराबाद पोलिसांनी नाशिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न करता परस्पर कारवाई केल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. विजय बुधा बिरारी (रा. नाशिक) असे मृताचे नाव असून, ते भाजप पदाधिकारी होते.
नाशिकमधील सराईत गुन्हेगार हैदराबादमध्ये जाऊन चोर्‍या करायचा. हैदराबाद पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले सोने नाशिकमधील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस पथक त्याला नाशिकमध्ये घेऊन आले. बिरारी असलेल्या ठिकाणी गुन्हेगार पोलिसांना घेऊन येताच त्यास आरोपी म्हणून अटक करण्यात आली. त्याला मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत आणण्यात आले. मात्र, याठिकाणी बिरारीने पोलिसांची नजर चुकवून बाल्कनीतून उडी मारत आत्महत्या केली.

हैदराबाद पोलीस नाशिक पोलिसांच्या ताब्यात

सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या पथकातील पाचजणांना ताब्यात घेतले आहे. विश्रामगृहात बिरारी यांच्याशी कोणती चर्चा झाली, त्यांनी तणावातून आत्महत्या केली की दुसर्‍या कोणत्या कारणाने, याबाबत आता नाशिक पोलीस तपास करत आहेत.

हैदराबाद पोलिसांना भोवले स्मार्ट पोलिसिंग

डिसेंबर २०१९ मध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याप्रकरणी ताब्यात असलेले चार नराधम हैदराबाद पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. तेव्हापासून हैदराबाद पोलीस देशभर चर्चेत आहेत. चोरीच्या गुन्ह्यात सराफ व्यावसायिकास अटक करण्यासाठी नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत मदत घेऊन कारवाई करावी. त्यानंतर न्यायालयीन परवानगीने अटक केलेल्या व्यक्तीस घेऊन जाणे गरजेचे असताना तसे न केले गेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांची कारवाई संशयास्पद आहे.