तब्बल १७ तास शस्रक्रिया, रुग्णाला वाचवण्यात यश

नाशिक : 35 वर्षीय महिला ओटीपोटात दुखणे, लघवी करताना त्रास होणे आणि जुलाब होत असल्याने शहरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. विविध तपासण्यांमध्ये तिच्या पोटात गाठी असून त्या विविध अवयवांना चिकटलेल्या असल्याचे आढळून आल्या. त्यानंतर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल १७ तास शस्त्रक्रिया करत तिला जीवदान दिले.

अपोलो हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण गोवर्धने यांनी या महिलेची तपासणी केली तेव्हा तिच्या पोटात वाढलेल्या कॅन्सरच्या गाठी गर्भपिशवी, जठर, मोठे आतडे यांना चिकटलेल्या असल्याचे लक्षात आले. या आजाराला “पेरिटोनियल कार्सिनोमेटोसिस” असे म्हणतात, तसेच, रुग्णाच्या शरीरात रक्ताचे व अल्बुमिन घटक कमी होत होते आणि रुग्णाला सायटोरिडक्टिव्ह सर्जरीची गरज होती. ही अत्यंत अवघड आणि क्लिष्ट शस्रक्रिया तब्बल १७ तास चालली आणि रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

यावेळी माहिती देताना डॉ. प्रवीण गोवर्धने म्हणाले की, ही एक अत्यंत अवघड आणि क्लिष्ट शस्रक्रिया असते. यासाठी सर्जन्सची टीम आवश्यक असते. प्रत्येक शस्रक्रिया करण्याआधी रुग्णाची फिटनेस टेस्ट केली जाते. यावेळी रुग्णाची शस्रक्रिया सुरू असताना रक्त रिझर्व्ह करण्यात आले. शस्रक्रिया करताना सुरुवातीला पोटात दुर्बीणीच्या सहाय्याने कॅन्सरची गाठ कुठे-कुठे आहे हे निरीक्षण करण्यात आले. यावेळी संपूर्ण पेरिटोनीयम काढण्यात आले. उदरपटलाला चिकटलेल्या गाठी, यकृताचा थर व यकृताच्या डाव्या भागातील गाठ, प्लीहा, जठर मोठ्या आतड्याच्या गाठी काढण्यात आल्या. गर्भाशय, लहान आतड्याचा भाग, मोठ्या आतड्याचा थोडा भाग एकत्रित काढण्यात आला. पित्ताशय मेसेंट्रीच्या गाठी, ओमेंटम काढले.

डॉ. अजय जाधव यांनी सांगितले की, या ऑपरेशनदरम्यान आतड्यांचे दोन ठिकाणी जोड देण्यात आले. ऑपरेशनदरम्यान पेशंटला रक्ताच्या पिशव्या चार द्याव्या लागल्या. ऑपरेशन नंतर रुग्णाला फुफ्फुसाचा त्रास होत होता. तेव्हा आयसीयूमध्ये डॉ. प्रवीण ताजणे व त्यांच्या टीमने पेशंटची खूप काळजी घेतली. 25 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले. या संपूर्ण ऑपरेशनला तब्बल 17 तास लागले. हे ऑपरेशनच्या शेवटी शरीरातील सर्व गाठी काढण्यात डॉक्टरांना यश आले. कॅन्सरच्या गाठीचे निदान लवकर झाल्यास कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो.\

यावेळी अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे युनिट हेड अजित झा म्हणाले, अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम , प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, फिसिओथेरपी टीम, आहार तज्ञ् हे सर्व अपोलेत एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने अशा शस्रक्रिया करणे शक्य आहे. डॉ. प्रवीण गोवर्धने, कॅन्सर सर्जन डॉ. अजय जाधव, डॉ. अंबरीश चॅटर्जी, भूल तज्ज्ञ डॉ. भूपेश पराते व डॉ. चेतन भंडारे यांनी खूप संयमाने व कौशल्याने अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्रक्रिया यशस्वी केली.