घरमहाराष्ट्रनाशिकव्यापार्‍यांनी पाठ फिरवताच टोमॅटो गडगडले

व्यापार्‍यांनी पाठ फिरवताच टोमॅटो गडगडले

Subscribe

नाशिक : प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना चांगल्या बाजाराने 2 महिन्यांपर्यंत दिलासा दिला. खर्च निघून येईल अशी आशा मनात असतांनाच दिवाळीनंतर मार्केट डाऊन झाले आहे. मागील वर्षी आधीच संपलेला बेंगलोरचा टोमॅटो हंगाम यावर्षी नेमका आताच सुरु झाला आहे. देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार-निर्यातदार कर्नाटककडे वळले असल्याने ही उतरण झाली आहे. तरी सध्याचे दर स्थिर राहतील अशी स्थिती आहे.

मागील काही वर्षे तेजीचे मिळाल्यामुळे यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपारिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले होते. त्यामुळे लागवड अर्थातच वाढलेली होती. यंदाच्या जोरदार पावसाने त्यातही चित्रा नक्षत्रातील पावसाच्या परतीच्या तडाख्याने उत्साहाची हवा बरीच कमी केली. या काळात पिक वाचवण्यासाठी या शेतकर्‍यांनी जीवाचे रान केले. औषधे, खते, मजुरी यासाठीचा खर्च यंदा दीड ते 2 पटीपर्यंत वाढला. त्यातही काही वाणांनी मोठाच दगा दिला. बरेच प्लॉट मर, सुकवा या रोगांना बळी पडले. याही परिस्थितीतून वाचलेल्या टोमॅटो उत्पादकांना प्रति क्रेटला 500 ते 800 रुपये दर मिळत असल्याने त्यातही दिलासा होता. मागील 5 दिवसांपासून या तेजीलाही ग्रहण लागले आहे. टोमॅटोचे प्रति क्रेटचे दर कमाल 800 वरुन हे दर कमाल 400 पर्यंत म्हणजे निम्म्याने खाली आले आहेत. हे इतके दर तरी टिकून रहावेत अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. तसे झाले तरच यंदाचा झालेला भरमसाठ खर्च निघून येईल. बेंगलोरचा हंगाम तसेच मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापार्‍यांकडून सांगितली जात आहेत.

- Advertisement -

मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्टयाचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यामुळे बेंगलोर हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. परिणामी टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले. मागील वर्षीचा धडा घेऊन बेंगलोर भागातील उत्पादकांनी लागवड उशिराच्या केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते 2 महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरवात झाली आहे.

निर्यातीत घट

बांग्लादेश हा भारतीय टोमॅटोसाठी सर्वात महत्वाचा खरेदीदार देश राहिला आहे. मागील 4-5 वर्षांपासून दोन्ही देशातील हा व्यापारही अडचणीत आलेला आहे. बांग्लादेशाने वाढविलेला 34 टक्के हा आयातकर हे त्यामागील प्रमुख कारण आहे. परिणामी टोमॅटोची ही निर्यात मंदावलेली आहे. गिरणारे, पिंपळगाव बसवंतच्या बाजारातून बांग्लादेशाकडे होणार्‍या निर्यातीत 70 टक्क्यांनी घट झाली आहे. हा माल गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांत देशांतर्गत बाजारात विकण्याचा पर्याय स्विकारला जात आहे. मात्र या बाजारातून अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात.

नाशिक बाजार समितीत टोमॅटो व्यापारी असलेले राजेश म्हैसधुणे हे टोमॅटो उत्पादकही आहेत. ते म्हणाले की, मागील 2 महिने टोमॅटोला तेजीचे दर मिळाले. बाजारात तुटवडा असल्याने हे दर मिळत होते. आताच्या दरात उतरण झाली असल्याने शेतकर्‍यांत नाराजी येणे साहजिक आहे. मात्र तरीही हे दर फारच कमी म्हणता येणार नाहीत. मंदीमुळे पिकाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. चांगला व जास्त माल मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यातूनही झालेला खर्च भरुन येण्यास मदत होऊ शकते. : ज्ञानेश उगले, कृषीतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -