एसटीचे स्टेअरिंग 38 खासगी चालकांच्या हाती

कंत्राटी कर्मचार्‍यांमुळे 20 फेर्‍यांची वाढ झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

ST Workers Strike: ST Corporation's big decision to stop private transport

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करुनही एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांचा संप न मिटल्याने महामंडळाने आता खासगी वाहन चालकांच्या हाती स्टेअरिंग सोपवले आहे. पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये 38 चालकांनी प्रतिसाद दिल्यामुळे एसटीच्या फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे राज्य शासनामध्ये विलनीकरण करावे, यासाठी दोन महिन्यांपासून कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. संपावर तोडगा न निघाल्याने महामंडळाने खासगी वाहन चालकांना कंत्राटी पध्दतीने सेवेत सामावून घेण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. त्याला जिल्ह्यातून 38 चालकांनी प्रतिसाद दिला असून त्यांनी एसटीचे स्टेअरिंग हाती घेतले आहे. त्यामुळे दिवसाला एसटीच्या फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाला साधारणत: शंभर होत असताना कंत्राटी कर्मचार्‍यांमुळे 20 फेर्‍यांची वाढ झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करत असलेल्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्यांना समज देवून सोडण्यात आल्याचे समजते. तसेच महामंडळाकडून कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याची कारवाई सुरुच असून बुधवारी 13 कर्मचार्‍यांना सेवेतून कमी केल्याची नोटीस बजावली आहे.