अशोकस्तंभ चौकाला मिळणार झळाळी; ‘सीएसआर’ अंतर्गत होणार काम

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध सुशोभिकरणाची कामे सुरू असताना आता महापालिकेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शहरातील चौकांचेही सुशोभिकरण करण्यात येत आहे. या धर्तीवर अशोकस्तंभ चौकाचेही सुशोभिकरण सुरू करण्यात आले असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या संकल्पनेवर चौकाला एक नवे रूप मिळणार आहे.

सीएसआर निधीतून हे काम केले जात आहे. सुमारे १५ लाख खर्चून हे सुशोभिकरण सुरू आहे. विशेष म्हणजे येत्या 15 ऑगस्टपूर्वी संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे अशोकस्तंभ चौकाचे रुपडे पालटणार आहे. या कामामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नाशिकमधील दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी पुढाकार घेत मदत केली. याशिवाय पुढील 10 वर्षांसाठी त्यांनी अशोकस्तंभाच्या देखभाल आणि दुरुस्तीचीही जबाबदारीदेखील स्विकारली आहे. या कामाचे डिझाईन आर्किटेक्ट विशाल घोटेकर यांनी केले आहे. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव या कल्पनेवर सुशोभिकरण साकारण्यात येत आहे. त्यामुळे या चौकातील शिल्परचना लक्षवेधी ठरणार आहे.