धूळ व चिखलावरच डांबरीकरण; मनसेने बंद पाडले काम

नाशिक : सातपूर परिसरातील संजीव नगर अंबड लिंक रोड या ठिकाणी महानगरपालिकेचे ठेकेदाराकडून चक्क धूळ चिखल व कचरा असलेल्या जागेवरच डांबरीकरणाचे काम सुरू होते. मनसेने या कामाला हरकत घेत हे काम बंद पाडले आहे काम बंद पाडत असतानाच या रस्त्याचे डांबरीकरण करताना कुठल्याही प्रकारे नियमांचे पालन केलं जात नाहीये. तसेच, निकृष्ट पद्धतीने डांबरीकरण होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

सातपूर परिसरातील संजीव नगर ते अंबड लिंक रोड या परिसरात काही दिवसांपूर्वी एमएनजीएल गॅस पाईपलाईनचे काम सुरू होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्यात आला होता. खोदलेल्या या रस्त्याचे पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्याचे काम शुक्रवार दिनांक २४ सुरू होते. मात्र, या ठिकाणी धूळ चिखल व कचरा असलेल्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात डांबरीकरण केले जात होते. त्यासोबत हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्या ठिकाणी डांबरीकरण केल्यानंतर काही महिन्यातच पुन्हा खड्डे होतील आणि असा शहरात इतर ठिकाणी देखील झाल्याचा आरोप मनसेचे विजय अहिरे यांनी केलाय.

याठिकाणी आम्ही धडक देत त्याठिकाणी सुपरवायझरला विचारपूस केली तर त्याने हे सगळे काम महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे सांगितले. मग मनपा अधिकारीच असे निकृष्ट काम करायला प्रोत्साहन देतात का ? ठेकेदार भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तसेच अधिकाऱ्यांना पोसून मनपाला दिवसाढवळ्या लुटतात का ? असा आमचा सवाल आहे. संबंधित ठेकेदार ए.एस.सोनजे यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे अशी आमची मागणी आहे. : विजय अहिरे, शहराध्यक्ष, मनसे रस्ते आस्थापना विभाग