फलज्योतिष थोतांड; वेळ, पैसा दवडू नका

निवडणूक आयोगाने रविवारी (ता.१०) निवडणूक जाहीर केल्याची वेळ अशुभ असल्याचा अपप्रचार काही ज्योतिषांकडून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फलज्योतिष थोतांड असून त्याच्या नादी लागून वेळ व पैसा वाया घालवू नये, असे संभाव्य उमेदवारांना आवाहन केले आहे.

निवडणूक आयोगाने रविवारी (ता.१०) निवडणूक जाहीर केल्याची वेळ अशुभ असल्याचा अपप्रचार काही ज्योतिषांकडून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फलज्योतिष थोतांड असून त्याच्या नादी लागून वेळ व पैसा वाया घालवू नये, असे संभाव्य उमेदवारांना आवाहन केले आहे. तसेच, काही पूजाविधी केलाच, तर हमखास निवडून येण्याचे बॉण्डपेपरवर लिहून घेण्याचेही आवाहन केले आहे.

निवडणूक ही अत्यंत अनिश्चिततेची गोष्ट असल्यामुळे बहुतांश उमेदवार ज्योतिषांच्या नादी लागतात. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी १७ व्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्याची वेळ अशुभ असल्याचे काही वाहिन्यांवर ज्योतिषांनी सांगण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उमेदवारांना या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. यामागे अशुभ वेळेचा फटका बसण्याच्या भीतीतून अनेक उमेदवार फलज्योतिषचा आधार घेतील. ज्योतिषी ग्रह शांती, यज्ञ, होमहवन, अभिषेक, पूजापाठ यांच्या नावाखाली अशा उमेदवारांकडून पैसे उकळतील. यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांचे काहीही होवो; परंतु फलज्योतिषांचे उखळ पांढरे होणार हे निश्चित. यामुळे नशिबावर हवाला ठेवणार्‍या उमेदवारांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फलज्योतिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. फलज्योतिष केवळ थोतांड असून त्याच्या नादी लागून पैसा, वेळ वाया घालू नये. समजा काही पूजाविधी करणार असालच, तर निवडून येण्याची बॉण्डपेपरवर हमी घ्यावी. निवडून न आल्यास त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास हरकत नसल्याचेही त्यात लिहून घ्यावेे, असे आवाहन अंनिसने केले आहे.

उमेदवारांचे भविष्य ग्रह नव्हे मतदार ठरवतात

फलज्योतिष थोतांड असून त्याच्या नादी लागून उमेदवारांनी आपला वेळ व पैसा वाया घालवू नये. लोकशाहीत उमेदवारांचे भविष्य मतदार ठरवत असताना, कुठलेही ग्रह नाही हे लक्षात ठेवावे. – डॉ. ठकसेन गोराणे, सरचिटणीस, महाराष्ट्र अंनिस