Homeमहाराष्ट्रनाशिकपावसाळ्याअखेर मुक्त विद्यापीठाच्या रस्ता कामाला मुहूर्त

पावसाळ्याअखेर मुक्त विद्यापीठाच्या रस्ता कामाला मुहूर्त

Subscribe

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठापासून विद्यापीठ फाट्यादरम्यान असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य सरकारन अर्थसंकल्पात 6 कोटी रुपये मंजुर केले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याचे काम लगेचच पूर्ण करणे शक्य नसले तरीही टेंडरप्रक्रियेसह इतर तांत्रिक मान्यता घेण्याचे काम या काळात झाल्यास पावसाळा संपताच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणे शक्य आहे.

पावसाळ्यातच रस्त्याच्या कामाचे संपूर्ण नियोजन करुन 3 महिन्यांत हे काम सुरू झाल्यास त्यापुढील 3 महिन्यात अर्थात एकूण 6 महिन्यात सिमेंटचा रस्ता तयार होईल. मात्र, तांत्रिक बाबींना उशीर झाल्यास रस्त्याचे काम पुन्हा वर्षभर लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. याअगोदर पावसाळापूर्व डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी आणि मुरुम टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, येथील गावकर्‍यांकडून हे काम थांबविण्यात आले होते. आम्हाला सिमेंटचाच रस्ता हवा असा आग्रह गावकर्‍यांनी धरला. यामुळे सिमेंटचा रस्ता तयार करण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.

सद्यस्थितीत या रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याच्या डाव्या बाजुने असलेला नाला अनेक ठिकाणी बुजविण्यात आल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागा नाही. यामुळे पावसाचे सर्व पाणी थेट रस्त्यावर येते. या पाण्यामुळेच रस्त्याला खड्डे पडतात. डांबरी रस्ता यामुळेच टिकाव धरू शकत नाही. यापूर्वीही डांबराचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र, ते सर्व अयशस्वी ठरले. अवघ्या 2 किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर तीन ठिकाणी पाणी साचते. याअगोदरही विद्यापीठाच्या कुलसचिवांनी बांबुचा रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, संकल्पना पूर्णत्वास गेली नाही. यात कालापव्ययही खूप झाला. त्यानंतर पुन्हा डांबरी रस्ता बनविण्याचा आराखडा आखण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याची डागडुजीच केली गेली.

पहिल्या टप्प्यात 79 लाख रुपये निधी उपलब्ध

विद्यापीठाचा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असला तरी जिल्हा परिषदेला सिमेंटच्या रस्त्यासाठी येणारा 4 ते 5 कोटी रुपये खर्च करणे शक्य नाही. यासाठीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. शासनाकडून टप्प्याटप्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 79 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

काय सांगतात आकडे ?

1 चौरस मीटरचा खड्डा बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 130 रुपये खर्च केले जातात. मुक्तच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अंदाजे 20 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, डागडुजीचे प्रयोग यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. मात्र ते फोल ठरले. सुमारे 1 किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करण्यासाठी 50 लाख खर्च अपेक्षित असतो. तर, 1 किलोमीटर सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी 2 कोटी खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठाचा 2 किलोमीटर लांबीचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यासाठी 4 कोटी अपेक्षित खर्च आहे. शासनासाठी ही रक्कम छोटी असल्याने शासनाने हा निधी त्वरीत उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होईल, अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली.