गोदा सन्मान पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांनी नमामी गोदा प्रकल्पाबाबत व्यक्त केला विश्वास

आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले यांचाही गोदा सन्मान पुरस्काराने गौरव

नाशिक : देशातील नद्या प्रदूषणमुक्त आणि अखंड प्रवाही राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच धर्तीवर नाशिकची गोदावरीही प्रदूषणमुक्त व्हावी, अविरत-निर्मल प्रवाहीत राहावी यासाठी केंद्र सरकारकडून नमामि गोदा प्रकल्प मंजूर करून आणणारच, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंचवटीतील गोदाघाटावर नाईन न्यूजच्या वतीने आयोजित गोदा सन्मान पुरस्कारांचे फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन करतानाच फडणवीस म्हणाले की, राज्याची अध्यात्मिक राजधानी अर्थात नाशिकच्या या सोहळ्यात शहर विकासात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या पुरस्कार्थींचा सन्मान करताना विशेष आनंद होत आहे. चांगले काम करणार्‍यांचा सन्मान व्हावा, चांगले काम करणार्‍यांच्या पाठिशी समाज संघटितपणे उभा आहे, हे दाखवण्यासाठी हा सोहळा आहे. नाशिक ही कुंभनगरी आहे. कुंभमेळा काळात गिरीश महाजन यांच्यावर संपूर्ण कुंभमेळयाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन सरकारने नाशिक महापालिकेवर मोठी आर्थिक जबाबदारी टाकली. मात्र, महापालिकेने निधीबाबत सरकारकडे निधीसाठी विनंती केल्यानंतर संपूर्ण निधी सरकारने उपलब्ध करून दिला.

गोदावरी ही आपली जीवनवाहिनी आहे. ही दक्षिणगंगा आहे. महाराष्ट्राचा दोन तृतीयांश भाग हा गोदावरी खोर्‍यात येतो. यावर कृषी अर्थव्यवस्था चालते. दोन दिवसांपूर्वीच गोदावरीच्या शेवटच्या टोकाला गडचिरोली जिल्ह्यात गेलो होतो. तिथे तीन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी गोदावरीचे निर्मल दर्शन झाले. अशाच पद्धतीने गोदावरीच्या १४०० किलोमीटरच्या प्रवासात ती निर्मल, अखंड आणि प्रदुषणमुक्त वाहात राहावी ही अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी नमामि गंगेच्या माध्यमातून गंगेचे शुध्दीकरण केले. नुकताच ११०० कोटींच्या मुळा-मुठा नदी शुध्दीकरण हाती घेतले आहे. नागपुरच्या नाग नदी शुध्दीकरणासाठी १९०० कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. त्यासोबतच नाशिकच्या गोदावरीसाठीही नमामि गोदा प्रकल्पासाठी सर्व पदाधिकारी, आम्ही याकरीता पुढाकार घेतला आहे. लवकरच केंद्राकडून याला मंजूरी मिळवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे नाईन न्यूजचे संचालक किशोर बेलसरे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक करत गोदा सन्मान पुरस्काराची संकल्पना विशद केली. यावेळी नाईन न्यूजच्या नवीन लोगोसह संकेतस्थळाचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी नाशिकचे माजीमंत्री तथा भाजपचे प्रभारी गिरीश महाजन, जयकुमार रावल, रवी अनासपुरे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार डॉ. राहुल आहेर, स्थायी समिती माजी गणेश गिते, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, अभिनेते हार्दीक जोशी, अमृता पवार, नाईन न्यूजचे संचालक अशोक कुटे, चिराग शर्मा आदी उपस्थित होते.

गोदा सन्मानार्थी

आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महापालिका आयुक्त रमेश पवार, हेमंत भोसले (पत्रकारिता), लसीकरण मोहिमेसाठी विशेष प्रयत्न करणारे श्वेता आव्हाड, सटाणा येथील तरूण नगरसेवक राहुल पाटील, कोविड काळात विशेष कामगिरीसाठी माजी नगरसेविका प्रियंका माने, मृतदेहांच्या सेवेकरी सुनीता पाटील, जलाराम ट्रस्टचे महेश शहा, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, आबा देशमुख, क्रेडाई नाशिक मेट्रो रवी महाजन, अनिल आहेर, सागर विंचू (अभियंता), सिध्दार्थ वनारसे (उत्कृष्ठ जि. प. सदस्य), कैलास देवरे (उद्योजक), नितीन मुलतानी (सामाजिक व व्यापार), पंकज जाधव (वास्तुविशारद), प्रशांत बाग (पत्रकारिता), सुमीत कुमठ (उत्कृष्ठ वास्तुविशारद), हेमंत धात्रक (सहकार), उध्दव निमसे, संगीता जाधव,राहूल दिवे , दिनकर पाटील (उत्कृष्ठ नगरसेवक), कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, एस. आर. रूंगठा (बांधकाम), डॉ. अतुल वडगावकर (आरोग्यक्षेत्र).