मूलबाळ होत नसल्याने पत्नीवर अत्यावर

लग्नात मानपान व हुंडा न दिल्याने आणि मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीवर शिवीगाळ व मारहाण करत अत्याचार केल्याची घटना आसाराम नगर, यावल (जि. जळगाव) येथे घडली. याप्रकरणी पीडित पत्नी माहेरी येत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती व सासरच्या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सहा महिने सासरची मंडळी चांगली वागली. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. तुला स्वयंपाक, घरकाम येत नाही. तुझ्या आईने तुला शिकवले नाही. तू काळी व रोगी आहे. तुला मूलबाळ होत नाही, तुला नांदवयाचे असेल तर माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, लग्नात मानपान व हुंडा दिला नाही, असे म्हणत पतीने तिच्यावर शिवीगाळ व मारहाण करत अत्याचार केला. तर सासरच्या मंडळींनी लग्नात माहेरच्यांनी दिलेले सहा तोळ्याचे दागिने काढून घेत तिला नांदविण्यास नकार दिला. पतीसह सासरचा त्रास असहाय्य झाल्याने पीडित विवाहितेने माहेरी येत सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.