घरमहाराष्ट्रनाशिकबीट मार्शलांमुळे फसला एटीएम मशीन चोरीचा डाव

बीट मार्शलांमुळे फसला एटीएम मशीन चोरीचा डाव

Subscribe

धुळ्यातील दोन चोरट्यांना अटक, मोक्का गुन्हा होणार दाखल

नाशिक : त्र्यंबक रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधील एटीम मशीन पळवण्याचा प्रयत्न दोन बीटमार्शल पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४) पहाटे ४.२० वाजता घडली. चोरटे पैशांऐवजी थेट एटीएम मशीन लंपास करत असताना पोलिसांनी हटकले. चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने भरधाव वेगान गाडी चालवत कट मारुन फरार झाले. पोलिसांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत सिनेस्टाईलने पाठलाग सुरु केला. पोलिसांनी हिरावाडी परिसरात दोन चोरट्यांना अटक केली असून चारजण फरार झाले आहेतमिलनसिंग रामसिंग भादा, गजानन मोतीराम कोळी (दोघेही रा.मोहाडी, जि.धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांनी एटीएम सेंटर येथे क्युआर कोड लावण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर येथे क्युआर कोड स्कॅनिंग करण्यासाठी लावण्यात आला आहे. मंगळवारी (दि.२४) पहाटे ४.२० वाजता बीट मार्शल कर्मचारी शरद झोले व दीपक धोंगडे क्युआर कोड स्कॅनसाठी आले असता त्यांना बोलेरो जीप व सहाजण एटीएम सेंटरमधील मशीन टायर रोपने बाहेर जीपमध्ये ठेवताना निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता मशीन टाकून पोलिसांच्या दिशेने भरधाव वेगाने जीप चालवत धारदार हत्यार पोलिसांवर उगारत जीवेठार मारण्याच्या इराद्याने पोलिसांच्या दुचाकीला कट मारुन फरार झाले. झोले व धोंगडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सिनेस्टाईलने चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. विधातेनगर, हिरावाडी, पंचवटी या ठिकाणी जीपला घेरुन अडविले. वाहन सोडून चोरटे पळून जात असताना दोघांना पोलिसांनी पकडले. तर चारजण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलनसिंग भादावर गंभीर स्वरुपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. तर कोळीवर ४ गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

चोरट्यांनी बोलेरो जीप पाळोरा पोलीस ठाणे हद्दीतील रावेर येथून चोरी केलेली आहे. पोलिसांनी दोघांकडून चोरीचा मुद्देमाला जप्त केला आहे. त्यांनी काही तासांपुर्वी मोखाडा (जि.पालघर) येथे अथर्व सराफ दुकानात दरोडा टाकल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२५ हजारांचे बक्षीस जाहीर

बीट मार्शलांनी पाठलाग करत दोन चोरट्यांना अटक केली व एटीएम मशीनमधील लाखो रुपयांची रोकड वाचवली. त्याबद्दल पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांनी बीट मार्शल कर्मचारी शरद झोले व दीपक धोंगडे यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांचा पत्रकार परिषदेत सत्कार केला.

- Advertisement -

शहरातील धाडसी बीट मार्शलांना शस्त्रे देणार

एटीएममध्ये ६ लाखांची रोकड होती. पाऊणतास थरार सुरु होता. शहरात बीट मार्शल तीन शिफ्टमध्ये ड्युटी करतात. पोलिसांकडे शस्त्रे असती तर सर्व चोरटे सापडले असते. त्यामुळे शहरातील धाडसी बीट मार्शलांना शस्त्रे देणार आहे. चोरट्यांवर मोक्का गुन्हा दाखल केला जाणार आहे.  – पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील

आंतरजिल्हा टोळीचे धुळे कनेक्शन

त्र्यंबक रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधील एटीम मशीन चोरी करण्यासाठी आलेले सहा चोरटे मोहाडी (जि.धुळे) येथील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शहरात पहाटे नाकाबंदी केली असतानाही सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -