भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या आंदोलना दरम्यान महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन कार्यालयार हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला असून अशा पदाधिकार्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.अशा पदाधिकार्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी सभागृह येथे राजेंद्र बागुल, माजी नगरसेविका आशा तडवी, नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष अल्तमश शेख, नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना पाटील, भालचंद्र पाटील, खजिनदार फारूक मंसूरी, कार्यालयीन सरचिटणीस राजकुमार जेफ, प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे सचिव जावेद इब्राहिम, अण्णा मोरे, शाहबाज मिर्झा, अरुण दोंदे, सागर खीवनसरा, कोणीक कोठारी, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
करारा जवाब मिलेगा
भारतीय जनता पक्षाकडून आज झालेले आंदोलन हे भ्याड पद्धतीचे असून छुपे आंदोलन करणार्यांचा निषेध करतो. यापुढे अशा पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल अनुद्गार व तसेच पुतळ्या जाण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर काँग्रेसचे पदाधिकारी देतील. आम्ही लोकशाही मानणारे आहोत परंतु अशा पद्धती शहरांमध्ये चालू झाल्यास काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी शांत बसणार नाही
– आकाश छाजेड, शहराध्यक्ष काँग्रेस