आनंदवल्ली अनधिकृत बांधकामप्रकरण अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न

नगरसेवक सलीम शेख यांचा आरोप; निलंबनाची मागणी

नाशिक : गोदावरी नदी पूररेषेतील बांधकामांचा वाद मिटला नसतानाच आनंदवल्ली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६५ मध्ये गोदावरी नदीपात्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या प्रकरणात प्रत्यक्ष पाहणीनंतर तथ्य आढळून आले. सुमारे दीड वर्ष या अनधिकृत बांधकामाकडे पाहण्याची तसदीदेखील नगरनियोजन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी घेतली नाही. आता दीड वर्षांनंतरही केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न करता त्यांना पदोन्नतीची भेट दिल्याचा आरोप नगरसेवक सलीम शेख यांनी केला आहे या प्रकरणी प्रशासनही अधिकार्‍यांना पाठीशी घालत असून या अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी नगरसेवक शेख यांनी केली आहे.

आनंदवल्ली येथील गोदा पार्कमध्ये झालेल्या बांधकामाबाबत नगरसेवक सलीम शेख यांनी मुद्दा उपस्थित केला. या बांधकामाला उपअभियंता संजय अग्रवाल व राजू आहेर यांनी ऑनलाईन मंजुरी दिल्याचा आरोप आहे. नगररचना विभागातील अधिकार्‍यांनी केवळ कागदोपत्री तपासणी केली असून, प्रत्यक्ष जागेवर परिस्थिती वेगळीच असल्याचा दावा शेख यांनी केला आहे. पीटी शीटनुसार नदीपात्र आणि प्रत्यक्ष बांधकाम या दोन्हींमध्ये १४०० चौ. मी. क्षेत्र गोदापात्रासाठी संपादित करण्यात आले आहे. मात्र, हे क्षेत्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसून बांधकाम थेट नदीपात्रात उभारले जात असल्यामुळे गोदापात्रासाठी आरक्षित केलेले क्षेत्र गेले कुठे, असा सवाल करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली.

त्यानंतर महापौरांनी या जागेची पाहणी करत असता शेख यांच्या आरोपात तथ्य आढळून आले. ज्यावेळी पहिली तक्रार दिली त्यावेळी प्रशासनाने ५ जून २०२० रोजी जागा मालक व इतरांना नोटीस काढली व त्यानंतर जागा मालक व विकासकांनी सदर नोटिसीला उत्तर दिल्यानंतर जागेची पाहणी केली. त्यानंतर पुनश्च १९ जून २०२० रोजी गोदा पार्कच्या आरक्षित जागेत भिंतीचे बांधकाम करत असल्याची नोटीस दिली, परंतु या बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही.
दीड वर्ष या अनधिकृत बांधकामाकडे पाहण्याची तसदीदेखील विभागाने घेतली नाही.

याविरोधात आवाज उठवल्यानंतर आता संबधित विकासक आणि जागा मालकांना नोटीसा देण्याचे सोपस्कार पार पाडून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे हा विभाग करत असल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे. या प्रकरणी जबाबदार असणारे अभियंता संजय अग्रवाल, राजू आहेर यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवक शेख यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

नगररचना अधिकार्‍यांच्या आशीर्वादामुळेच हे घडल्याचा दावा करीत पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अग्रवाल यांची बदली करण्याची मागणीदेखील सलीम शेख यांनी केली आहे. आताही केवळ जागा मालकांना हद्द खुणा दाखवायचे, पुनश्च मोजणी करावयाच्या नोटीसा देवून प्रशासन आपल्या भूमिकेपासून पळकाढू धोरण स्विकारत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होऊन सत्य परिस्थिती बाहेर येत नाही, तोपर्यंत या अधिकार्‍यांना या विभागात नियुक्त्या देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. – सलीम शेख, नगरसेवक