वाॅचमनच्या डोळ्यात मिरची टाकून एटीएम लुटण्याचा प्रयत्न

मध्यरात्री चोरट्यांना प्रतिकार करत पळवून लावणा-या पती पत्नीचे कौतुक

नाशिकरोड : पळसे येथील महामार्गालगत असलेल्या  बॅंक ऑफ इंडिया चे एटीएम लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी येथील वाॅचमनच्या डोळ्यात मिरची टाकून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे, यावेळी वाॅचमनची पत्नीने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पोबारा केला, नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दरम्यान, डोळ्यात मिरची टाकलेली असतांनाही तीव्र प्रतिकार करुन चोरांना पळवून लावणा-या पती पत्नीचे परिसरात कौतुक होत आहे.

समजलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बस स्थानक परिसरात साई सर्विस स्टेशन व गॅरेज आहे, याठिकाणी एका गाळ्यात एटीएम असून गुरुवारी (दि.२५) पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडिया चे  एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला, याठिकाणी जवळच राहत असलेले व रात्रीच्या वेळी वाॅचमन काम करणारे दिनकर कोंडाजी गायधनी (५७) यांनी त्यांना हटकले असता चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण करत असतांना पतीचा आवाज ऐकून दिनकर यांच्या पत्नीने आरडाओरडा करत प्रतिकार केला, पती-पत्नीच्या आवाजाने परिसरातील नागरिक येतील या भितीने चोरट्यांनी दगडफेक करत तेथून पोबारा केला, नाशिकरोड पोलीस ठाण्यात माहिती समजताच घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले.