घरताज्या घडामोडीपक्षादेश गेला तेल लावत, मिसळ पार्टीला मनसे अध्यक्षांची हजेरी

पक्षादेश गेला तेल लावत, मिसळ पार्टीला मनसे अध्यक्षांची हजेरी

Subscribe

मनसेतून भाजपमयी झालेले माजी आमदार वसंत गिते यांच्या मिसळ पार्टीला जो जाईल त्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी काढले. मात्र या आदेशाला ‘तेल लावत’ मनसेचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष अंकुश पवार आणि जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनीच हजेरी लावली. महत्वाचे म्हणजे सोशल मीडियावर पाठवलेला आदेश हा खोडसाळपणा होता, असे स्पष्टीकरण दातीर यांनी दिले. तर दुसरीकडे इचम यांनी आदेश अधिकृत असल्याचे स्पष्ट केले. त्याममुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात महाविकास आघाडी विरूध्द शिवसेना असा सामना रंगलेला असला तरी, नाशिकमध्ये वसंत गिते यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांसोबत भाजप नेत्यांनी एकमेकांशी हितगुज साधत मिसळवर ताव मारला. ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने गितेंच्या पक्षांतराच्याही चर्चा घडू लागल्या आहेत. या पार्टीच्या बाबतीत मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांची उत्सूकता ताणली गेली होती. गिते यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काही मनसैनिक नाराज आहेत. त्यातच गितेंच्या मनसे प्रवेशाच्या अफवेने मनसेतील जुन्या पदाधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा परिस्थितीत मनसेने नाकाबंदीचे धोरण अवलंबत मिसळ पार्टीला जाणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. प्रत्यक्षात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, सुजाता डेरे यांच्यासह अन्य काही पदाधिकारी या मिसळ पार्टीला आवर्जुन उपस्थित होते. असे असतानाही प्रदेश उपाध्यक्ष इचम यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही.

- Advertisement -

सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी

एकमेकांवर टिकेचे आसुड ओढणार्‍या शिवसेना आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मिसळ पार्टीत े एकमेकांच्या गळयात गळे घालून बोलतांना दिसून आले. यावेळी शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी तर गितेंना आपल्या पक्षात येण्याचे खुले आमंत्रणच दिले. यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शिवेसेना नेते बबनराव घोलप, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, शिवाजी गांगुर्डे, सत्यभामा गाडेकर, माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, विनायक पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, भाजपनेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रशांत जाधव आदि उपस्थित होते.

ज्या पदाधिकार्‍यांनी या मिसळ पार्टीला हजेरी लावली त्यांच्यापर्यंत कदाचित माझा मेसेज पोहचला नसेल. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना कळवणार आहे.
रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

- Advertisement -

मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. पण पार्टीला न जाण्याचा आदेश मी दिलेला नाही. सोशल मीडियावरील आदेश हा खोडसाळपणा आहे. वरिष्ठांशी चर्चा करुनच पार्टीला हजेरी लावली.
दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष, मनसे

हा राजकीय कार्यक्रम नव्हता. पक्षीय विचार भलेही वेगवेगळे असतील. परंतु राजकारणापलिकडेही कार्य ऋणानूबंध अ्रसतात. राजकीय जोडे बाजूला ठेवत आम्ही कार्यक्रमाला हजेरी लावली.
अंकुश पवार, शहराध्यक्ष, मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -