अंमली पदार्थांना विरोध करत पोलिसांतर्फे सायकल रॅली

नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध उपक्रमांद्वारे आरोग्याचा जागर

नाशिक :  जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी अंमली पदार्थांना विरोध करत नाशकात शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता सायकल रॅली काढण्यात येऊन आरोग्याचा जागर करण्यात आला. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ मुक्ततेची शपथ दिली. या सायकल रॅलीत पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह नाशिककरांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत विविध उपक्रमांना प्रतिसाद दिला.

या जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले होते. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २५ जून ते १ जुलै २०२२ या कलावधीत अंमली पदार्थविरोधी जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अंमली पदार्थ सप्ताह दरम्यान नागरिकांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व्हावी याकरीता विविध सामाजिक संस्थांशी समन्वय साधून पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेनिहाय वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत.

२६ जून या जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमीत्त नाशिक शहरात जनजागृतीसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जनजागृती कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी तसेच शहरातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, त्यांचे कुंटुंबीय व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, महापालिका आयुक्त महानगर पालिका नाशिक, जिल्हा व सत्र न्यायालय नाशिकचे मुख्य जिल्हा न्यायाधीश जगमलानी, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस अधीक्षक (महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक) डॉ. शिवाजी पवार, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल रॅलीला गोल्फ क्लब मैदान येथून ६.१५ वाजता सुरुवात झाली. गोल्फ क्लब मैदान – मायको सर्कल – चांडक सर्कल- सुयश हॉस्पिटल – रुची हॉटेल- गडकरी चौक- सीबीएस सिग्नल-अशोकस्तंभ – जुना गंगापूर नाका – कॅनडा कॉर्नर – जुने पोलीस आयुक्त कार्यालय – शरणपूर सिग्नल- मायको सर्कल व पुन्हा गोल्फ क्लब मैदान येथे ७.१५ वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड यांच्या संकल्पनेतून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. अजय भन्साळी, साधना दुसाने व पथकाने अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर ‘मीच माझा वैरी’ हे पथनाट्य सादर केले. यानंतर मान्यवरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सायकल रॅलीत सहभागी सायकलिस्टना पदक देण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन व पोलीस आयुक्तालयातील अधिकारी अंमलदार यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल हेल्मेट बक्षिस स्वरूपात देण्यात आले. पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व डॉ. मनीषा रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांनी आभार मानले.