घर महाराष्ट्र नाशिक नाशिककरांचे हक्काचे व्यासपीठ ‘बाबाज् थिएटर’

नाशिककरांचे हक्काचे व्यासपीठ ‘बाबाज् थिएटर’

Subscribe

डॉ.प्रशांत भरवीरकर । मुक्तपीठ 

नाशिककरांना हक्काचे व्यासपीठ म्हणून सर्वांना ज्ञात असलेल्या बाबाज् या संस्थेची स्थापना १७ सप्टेंबर २००० ची. येत्या १७ ला २३ वर्षे पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण आहे. आज, १३ सप्टेंबरपासून पाच दिवस परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सायंकाळी विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेला आढावा…

- Advertisement -

नाशिक शहराला निसर्गाने भरभरून दान दिलेलं आहे. प्राचीन काळापासून देवादिकांनीही वास्तव्यासाठी या शहराची निवड केल्याची नोंद आहे. मंत्रभूमी ते तंत्रभूमी या परिवर्तनातच दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज व कानेटकर या महान विभूतींनी या शहराला सिनेमा व नाटकाची देणगी दिलेली असल्याने कलेची परंपरा या शहराने जपलेली दिसते. इथे कलेची कदर, संवर्धन आणि पूजन केले जात असून अभिजात संगीत, नृत्य, नाट्य आणि कलेचे पूजन करणारे अनेक कलाकार आहेत. परंतु मंबई-पुण्याप्रमाणे आपल्या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था या शहरात नसल्याने स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ व रंगमंच मिळवून देण्याच्या मूळ उद्देशाने प्रशांत जुन्नरे यांनी बाबाज् थिएटरची संकल्पना सर्व कलाकारांना सोबत घेऊन मांडली आणि प्रत्यक्षात नावारुपाला आणण्याच्या उद्देशाने नाना पाटेकर यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन केले तो दिवस होता १७ सप्टेंबर २०००.

बाबाज्च्या स्थापनेच्या वेळी ज्येष्ठ-श्रेष्ठ विचारवंत, कलाकार, तंत्रज्ञ, वादक अशी सर्व स्तरातील मंडळी त्यांच्या सोबत होती. त्या सर्वांची नावे घेणे येथे उचित ठरेल. प्रशांतदादांच्या बोलण्यातून कायम त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होताना आपण नेहमी ऐकतो. त्यांच्या प्रमुख पाठीराख्यांमध्ये सर्वश्री हेमंतजी टकले, विलासभाऊ लोणारी, अण्णा झेंडे, कैलास पाटील, सदाकाका जोशी, दत्ता पाटील, सचिन शिंदे, सी.एल. कुलकर्णी, पं. मकरंद हिंगणे, विनोद राठोड, दीपक कुलकर्णी, रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी, संगीता पाटील, अमोल पाळेकर, प्रशांत महाबळ, अभय ओझरकर, प्रवीण कांबळे ही नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतात. आज ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात अतिशय दिग्गज आहेत परंतु त्यांचं बाबाजशी असलेले नाते, या सर्वांनी जपून ठेवले आहे, कदाचित बाबाज हा त्यांचा आवडीचा मंच असावा म्हणूनही असेल पण हे नाते आजही घट्ट आणि अबाधीत आहे, हे विशेष! या सर्वांच्या संकल्पना आणि बाबाजचा हक्काचा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची यशस्वी शृंखलाच सुरु झाली. पाडवा पहाट ही संकल्पना अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याचे श्रेय, अर्थातच बाबाज्चेच.

- Advertisement -

बाबाज्च्या ‘पाडवा पहाट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजात संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांच्या कलेचा मनसोक्त आनंद समस्त नाशिककरांनी घेतला आहे. ज्यामधे स्वराधिराज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित सुरेश वाडकर, पंडित शौनक अभिषेकी, उस्ताद झाकीर हुसेन तसेच शामरंग संगीत समारोह, पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती महोत्सव सारख्या कार्यक्रमातून अनेक दिग्गजांना आपल्या शहरात त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे. रंगभूमी हे व्यक्तीमत्व विकासाचं गुरुकुलच होय. इथे शब्द, शब्दरचना, त्याचे वाचन, त्या अनुषंगाने अभिनय करून एक वेगळेच व्यक्तिमत्व प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते ज्याला तुम्ही ‘परकाया प्रवेश’ किंवा भूमिकेत शिरणे असेही म्हणतात. ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. तरुणाईला जे उद्या शिकावेच लागणार आहे ते सर्व ज्ञान ही रंगभूमी देते.

नाटकाची तालीम, वेळेचे महत्व, सातत्य आणि उत्तमच करायची सवय आणि शिकवण देते तर प्रत्यक्ष प्रयोग आत्मविश्वास आणि सभाधीटपणाचा स्वानुभव देत असतो. आज तरी नाटक, सिनेमा व मालिका यातील सहभागाबाबत पुणे व मुंबई नंतर नाशिकचा नंबर लागतो. त्यासाठी नाशिकमधील अनेक संस्था पुढाकार घेऊन तरुणाईला मार्गदर्शन करत आहे. त्या सर्वांचा नामोल्लेख करणे इथे शक्य नाही परंतु ती सर्व मंडळी एकाच नावेचे प्रवासी आहेत. यातील प्रत्येकाच्या कामाची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी अंतिम उद्देश मात्र एकच आहे आणि तो म्हणजे ‘उद्याचा रंगकर्मी आणि प्रेक्षक’ घडवणे, जी काळाची गरज होय.अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ घडवत असतांना त्यांना उपलब्ध असणारा मंच हा केवळ कामगार व राज्यनाट्य स्पर्धा इथपर्यंत सीमित होता. त्यामुळे या सर्व रंगकर्मींना अगदी प्राथमिक स्तरावरचा रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या मूळ उद्देशाने प्रशांत जुन्नरे यांनी बाबाज् थिएटरची स्थापना केली. ही संस्था कोण्या एकाच्या मालकीची असल्याचे दादांनी आणि नाशिककरांनी कधीही मानले नाही. त्यामुळेच प्रत्येक रंगकर्मीने बाबाजच्या उपक्रमात उत्साहाने आपला सहभाग नोंदवला आहे.

बाबाज् थिएटरची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. नाशिककरांच्या व महाराष्ट्रातील रंगकर्मींच्या हृदयात स्थान असलेल्या या संस्थेच्या बाबाज करंडक स्पर्धेत मुंबई, ठाणे, कल्याण नवीमुंबई, पुणे, सातारासह धुळे, नगर व औरंगाबाद शहरातील संस्था ’बाबाज् थिएटर’ या संस्थेची विश्वासाहर्ता लक्षात घेऊन आपला सहभाग गत २२ वर्षांपासून नोंदवत आहेत. अर्थकारण आणि राजकारण यांना अजिबात थारा न देणार्‍या बाबाजची ही माणसांची मिळकत हेच त्याचं भांडवलही असल्याने कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय आजही बाबाजचा प्रत्येक उपक्रम साजरा होतो आणि यशस्वीही. किंबहुना नाशिक शहरातील बाबाज थिएटरच्या आमंत्रणाला महाराष्ट्रातील कोणताही लहानमोठा कलाकार सहसा अव्हेरत नाही, यापेक्षा जास्त काही ओळख करून देण्याची गरज बाबाजला कधीही वाटलीच नाही. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये बाबाज थिएटरने सांस्कृतिक सोहळा आयेजित केला आहे. ह्या सांस्कृतिक सोहळ्या दरम्यान विविध प्रकारचे संगीत, नृत्य, परिसंवाद असे पाच दिवस दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांना आपण हजेरी लावावी अशी नम्र विनंती.

(लेखक कवी, गीतकार व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

- Advertisment -