मिठाई, फरसाण विक्रीवर बंदी

FDA action over Adulterated food

 

जिल्हयातील सर्व फरसाण, मिठाई दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले. पुढील आदेश होईपर्यंत ही सर्व दुकाने बंदच राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी या दुकानांना परवानगी देण्यात आली होती मात्र या दुकानांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता करोना संसर्ग रोखण्यासाठी अशा उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा आणि उद्योग पुरवविणार्‍या आस्थापनांना बंदी घालण्याबाबतचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. या आदेशानुकसार जिल्हयात फरसाण व मिठाई विक्रीची दुकाने सुरू होती. मात्र, राज्यात करोनाचा वाढता फैलाव आणि दुकानात होणारी गर्दी याचा विचार करून राज्य शासनाने ही दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २१ एप्रिल रोजी महसूल विभागाने काढलेल्या सुधारित आदेशात १७ एप्रिलच्या आदेशातील फरसाण व मिठाई विक्रीच्या दुकानांना वगळण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवारी काढला. या आदेशाचे पालन न करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) या कलम १८८ अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

 

… अन्यथा कडक कारवाई

शासनाने यापुर्वी या मिठाई, फरसाण उत्पादन व विक्रीला परवानगी दिली होती मात्र परिस्थितीचा आढावा घेतला असता फरसाण, मिठाई दुकानांसमोर होणारी गर्दी लक्षात घेता शासनाकडून प्राप्त आदेशानूसार ही परवानगी रदद करण्यात आली आहे. त्यामुळे दुकाने सुरू ठेवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

चंद्रकांंत साळुंखे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन