नाशिक : वादग्रस्त शारदा शाळेत अप्रशिक्षित शिक्षक गोकुळ हिरे यांनी अनेक गैरकारभार केल्याचे आरोप संस्थेचे दिवंगत सचिव सखाराम सरकटे यांनी केले आहेत. गोकुळ हिरे यांनी पदाचा दुरुपयोग करत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट शालार्थ आयडी तयार केले. तसेच, शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देऊन शासनाची फसवणूक केली आहे. शारदा शाळेतील आर्थिक घोटाळ्यात हिरे हेच मास्टरमाईंड असल्याचे तक्रारींवरुन स्पष्ट होत असून, हिरेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू बैरागी यांनी महालेखापालांकडे केली आहे.
महानगरपालिका हद्दीतील सातपूरच्या प्रबुद्ध नगरातील कथित शारदा विद्यामंदिराच्या गैरकारभाराबाबत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. संस्थेचे अप्रशिक्षित शिक्षक गोकुळ हिरे यांनी संस्थाचालकांना न जुमानता अनेक गैरकारभार केल्याचे संस्थासचिव दिवंगत सरकटे यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते बापू बैरागी यांनीदेखील याप्रकरणी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, असे असतानाही हिरेंविरुद्ध कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शारदा शाळेत हिरेंनी नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या केल्याच्या तक्रारी असताना हिरेंना शिक्षणाधिकार्यांकडून पाठीशी घातले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिवंगत सचिव सरकटे यांनी हिरेंच्या कारभाराबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. २०२० मध्ये सातपूर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत हिरेंची १९९९ मध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर हिरेंना डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, हिरेंनी २००५ पर्यंत डी.एड. पूर्ण केले नाही. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे त्यांनी परस्पर वैयक्तिक मान्यता प्रस्ताव पाठवून त्यात १९९९ ऐवजी १९९६ असा बेकायदेशीर बदल करुन महापालिकेच्याही डोळ्यांत धूळफेक केली.
१५ मे २००४ मध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या ठरावात हिरेंनी स्वतःची पत्नी वैशाली बोरवे यांचा शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव स्वतःच्या स्वाक्षरीने महापालिकेकडे पाठविला. मात्र, या प्रस्तावावर संस्थेने तीव्र हरकत घेत असा कोणताही ठराव केलाच नव्हता. तरीही हिरेंनी पत्नीच्या नावाने जुलै २०१३ ते एप्रिल २०१४ या कालावधीचे वेतन लाटले. विशेष म्हणजे ज्या कालावधीचे वेतन हिरेंनी लाटले त्या कालावधीत वैशाली बोरवे या संस्थेत कार्यरतच नव्हत्या, अशी धक्कादायक माहितीदेखील दिवंगत सरकटेंच्या तक्रारीतून पुढे आली आहे.
दरम्यानच्या काळात सरकटेंचे निधन झाल्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पांघरुण पडले व यामागील सूत्रधारांचा घोटाळा गुलदस्त्यात राहिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बापू बैरागी यांनी राज्याच्या महालेखापाल व जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार केली. गोकूळ हिरेंनी पदाचा दुरुपयोग करुन पत्नी वैशाली बोरवे व अन्य शिक्षिका जयश्री हाडोळे यांचा बनावट ठराव करुन नियुक्तीचे आदेश काढले. २०१२ पासून शिक्षण सेवक योजना लागू नसताना महापालिका शिक्षणाधिकार्यांनी शारदा शाळेच्या शिक्षकांना मान्यता दिल्याने तात्कालीन शिक्षणाधिकारीदेखील संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.
हेही वाचा : शारदा शाळेची ‘बनवेगिरी’, खोटी माहिती देत लाटले अनुदान; शिक्षणाधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात
हिरेंनी नियुक्त केलेल्या बोगस शिक्षकांना अनुदानित तत्वावर घेण्याबाबत संस्था आणि महापालिकेचा कोणताही प्रस्ताव नसताना, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडील प्रस्तावानुसार बेकायदा वेतन सुरू करण्यात आल्याचा आरोपही बैरागी यांनी तक्रारीत केला आहे. शारदा विद्यामंदिर संस्थेने नियमानुसार केलेल्या ठरावात एस.सी. प्रवर्गासाठी विजया धिवरे यांचा प्रस्ताव पाठविला असताना, महापालिका शिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयातून हा प्रस्ताव संशयास्पदरित्या गहाळ झाला असून, धिवरेंच्या जागी अचानक जयश्री हाडोळे यांच्या नावाचा आदेश देण्यात आल्याने एकूणच या संपूर्ण गैरकारभारामागे अधिकार्यांसह हिरे व त्यांच्या सहकार्यांचे मोठे अर्थपूर्ण संबंध असल्याचाही आरोप बैरागींनी केला आहे. याप्रकरणी विजया धिवरे यांनीही सातपूर पोलिसांत गोकुळ हिरेंसह तात्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गोकूळ हिरे बनवेगिरीचा मास्टर माईंड
हिरे याने 2004 मधील नियुक्तीचा ठराव दाखवून 2012 स्वत:ची पत्नी वैशाली बोरवे या नावाच्या ठरावावर सूचक म्हणून भगवान ताजणे यांच्या नावाचा उल्लेख आढळतो. त्याआधारे मनपाकडून बोगस नियुक्ति आदेश पारित करून जुन २०१३ ते फेबु २०१४ पर्यंत २० आणि ४०! वेतन देखिल काढून घेतले. पगार पळत्रकावर मुख्याध्यापक म्हणुन हिरे याची स्वक्षरी आढळते. प्रत्यक्ष २०१२ मधील कार्यरत जयश्री हाडोळे यांच्या ठरावात देखील भगवान ताजणे यांच्या सूचक म्हणून उल्लेख आढळतो. ठराव २०१० मधील दाखवला आहे. मात्र दोन्ही ठराव नमुद तारखांना झाले नाहीत. म्हणजेच दोन्ही ठराव हे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सरकटे यांनी लोक उपायुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार चौकशी प्रसंगी त्यांनी सर्व मूळ ठराव सावर प्रोसिंडिंग केलेत. पडताळणीप्रसंगी नमूद ठराव क्रमांक व दिनांक या प्रोसिडिंगमध्ये आढळून आलेले नाही. म्हणजेच हे ठराव बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या शाळेवर कार्यानुभव शिक्षकाचे पद निर्माण नाही. त्यासाठी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. या शिक्षकाचा सेवा सातत्याचा प्रस्ताव संस्थेने पाठवलेला नाही. नियुक्ती प्रस्तावच हा शासनाच्या नियमाप्रमाणे नसतानाही भ्रष्टाचारी मार्गाने आदेश पारित करण्यात आला सेवा सातत्याचा प्रस्ताव नसतानाही त्याला वेतन सुरू करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत उपसंचालक कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी सध्या काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. : गोकुळ हिरे, शिक्षक, शारदा विद्यामंदिर, सातपूर