उंटवाडी येथील महाकाय वटवृक्षाला हेरिटेज दर्जा

२०० वर्षाहून अधिक प्राचीन वटवृक्षासाठी वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक राव यांच्याकडून दिले जाणार पत्र

नवीन नाशिक – उंटवाडी येथील २०० वर्षाहून अधिक प्राचीन असलेल्या महाकाय वटवृक्षाला आता संरक्षित वृक्ष (हेरिटेज ट्री) चा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच तसे पत्र दिले जाणार असल्याची माहिती राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पी. राव यांनी दिली.

उंटवाडी रस्त्यावरील नंदिनी नदी किनारी हा वटवृक्ष अनेक वर्षांपासून दिमाखात उभा असून. या वटवृक्षाखालीच नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन स्वयंभू म्हसोबा महाराज देवस्थान आहे. या ठिकाणी ब्रिटीशांच्या काळातही यात्रा भरत असल्याच्या शासनदप्तरी नोंदी आहेत. त्यामुळे या वटवृक्षाच्या अतिप्राचीन असल्याच्या मान्यतेला पुष्टी मिळाली आहे. शहरात विकासाच्या मुद्द्यावर ठिकठिकाणच्या वृक्षांची सर्रास कत्तल होत असताना, या वटवृक्षासारखे प्राचीन वृक्ष नामशेष होण्याची भीती निर्माण झाल्यानेच उंटवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा वटवृक्ष वाचवण्यासाठी वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाकडे पाठपुरावा केला होता.

हा वटवृक्ष नेमका किती वर्षे जुना आहे, याचे परीक्षण करण्यासाठी राव यांनी वटवृक्षाच्या ठिकाणी भेट दिली. वटवृक्षावर येणारे पक्षी, वटवृक्षाचा घेर, झाडाच्या पारंब्याची लांबी याविषयी सखोल अभ्यास करून ग्रामस्थांची मतेही जाणून घेतली. यावेळी उंटवाडी ग्रामस्थांच्या वतीने वाय. एल. पी. राव यांचे श्री म्हसोबा महाराज देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मधुकर तिडके यांच्या हस्ते मानाचे वस्त्र, तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.

याप्रसंगी सामाजिक वनीकरण खात्याचे विभागीय अधिकारी चंद्रकांत भारमल यांच्यासह अंबादास जगताप, सदाशिव नाईक चंदु तिडके, दिनकर तिडके, केशव पाटील, यादव पाटील, संतोष कोठावळे, बाजीराव तिडके, विठ्ठल तिडके, विलास जगताप, राजेश गाढवे आदींसह उंटवाडीतील वयोवृद्ध ग्रामस्थ व म्हसोबा महाराज भक्त उपस्थित होते.