घरमहाराष्ट्रनाशिकबाजार समिती निवडणुकीचे रण पेटू लागले; 'दिंडोरी' तालुक्यात काय परिस्थिती ?

बाजार समिती निवडणुकीचे रण पेटू लागले; ‘दिंडोरी’ तालुक्यात काय परिस्थिती ?

Subscribe

नाशिक : वर्षानुवर्षे सत्ता अबाधित राखणार्‍या सत्ताधार्‍यांना त्यांचेच बोट पकडून राजकारणात येणार्‍यांनी आव्हान देत शह देण्यासाठी त्यांच्याकडूनच राजकारणातील खाचाखोचा, बारकावे समजून घेतलेल्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर करण्यास निवडणुकीच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. चिल्लर राजकारण्यांपासून गावागावातील अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करुन वर्चस्वाचा प्रभाव दर्शविणार्‍यांना याचा अनुभव उशिरा का होईना आला आहे. वर्चस्ववादाच्या या लढाईचा परिणाम येणार्‍या विविध निवडणुकांवर होणार यात शंकाच नाही. याची दुसरी बाजू अशी की सत्ताधारी गटाला शह देण्याचे चित्र उभे करायचे व ऐनवेळी मिळेल ते पद पदरात पाडून घेण्यासाठी हा अट्टाहास तर नाही ना याचाही अग्रक्रमाने विचार जागृत मतदार करु लागले आहेत.

दरम्यान, सत्ता एके ठिकाणी केन्द्रीत झाली तर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम गावागावांतील राजकारणात पडतो व अनपेक्षित हस्तक्षेपाची परिणिती विरोधात होते. हेच चित्र बाजारसमीतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येत आहे. यात गोची झाली आहे ती एका पक्षांतर्गत पडलेल्या फुटीमुळे पक्षनिष्ठा कोणाबरोबर ठेवावी अशा सक्षम नेते व कार्यकर्त्यांची. दरम्यान हा खटाटोप सत्ता प्राप्तीसाठी व त्या माध्यमातून शेतकरीवर्गाचा विकास करण्यासाठीचे दिवा स्वप्न दाखविणे व प्रत्यक्षात ते वास्तव स्वरुपात पुढे येणे हे चित्र आगामी काळ ठरविणार असून एकंदरीत दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने नामनिर्देशन पत्र दाखल ते माघारी यानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी अस्तित्वाची लढाई आता सुरु झाल्याचे चित्र वर्तमानस्थितीवरुन दिसून येत आहे हे नाकारुन चालणार नाही.

- Advertisement -

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. चेअरमन दत्तात्रेय पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून सत्ता आहे. दिंडोरी बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटाने बैठक घेत स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने विद्यमान चेअरमन दत्तात्रेय पाटील व सत्ताधारी गटाच्या कामकाजाबाबत टीका करून स्वत्रंत पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, वणी आदिवासी सोसायटीचे व्हा.चेअरमन प्रशांत कड यांनी दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर टीका करत बाजार समितीने शेतकरी हिताची कामे केली नसल्याचा आरोप करून नवीन लोकांना संधी देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी गेले सहा महिन्यांपासून तयारी करत गावोगावी जात शेतकरी व मतदारांपर्यंत आपली भूमिका मांडली आहे. बाजार समितीचा पिंपळगाव बाजार समितीसारखा विकास करण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांचा आपल्यावर दबाव नसून कोणत्याही परिस्थितीत पॅनल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी विकास पॅनल करताना त्यात सर्वपक्षीय उमेदवार घेणार असून याबाबत सर्व पक्षांसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्वपक्षीय पॅनल सक्षमपणे उभा राहून परिवर्तन होईल असा विश्वास कैलास मवाळ, गंगाधर निखाडे, प्रशांत कड, राजेंद्र महाले, योगेश पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -
राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधार्‍यांना देणार शह

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या दिंडोरी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच एका गटाने विद्यमान सत्ताधारी गटाविरोधात रणशिंग फुंकले असून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत सर्वसमावेशक शेतकरी विकास पॅनल उभा करण्याचा निश्चय केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -