घरउत्तर महाराष्ट्रचैतन्य पर्वाला सुरुवात; ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला...

चैतन्य पर्वाला सुरुवात; ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला !

Subscribe

नाशिक : सगळीकडे उत्साहाची उधळण, सकाळपासून पावसाने दिलेली उघडीप, ढोलताशा, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया… मोरयाच्या गजरात उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाचे वाजत गाजत उत्साही वातावरणात घरोघरी आगमन झाले. गणरायाच्या आगमनाने गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पुढील दहा दिवस मोठया भक्ती भावाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. (Consciousness in Nashik city dew to Ganeshotsav 2023)

गणरायाच्या आगमनासाठी गेल्या महिनाभरापासून शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. मंगळवारी तर गणरायाच्या आगमनाप्रीत्यर्थ शहरात उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासूनच घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनाने वातावरणात उत्साह पाहायला मिळला. शहरातील काही छोट्या मोठ्या मंडळांनी त्यांच्या भव्य गणेश मूर्तींना ढोल ताशांच्या गजरात मंडपात आणले यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लेझीमचा नृत्याचा फेर धरत गणरायाचे जोरदार स्वागत केले. काही मंडळातील महिला पदाधिकार्‍यांनी तर फुगडी सह नृत्याचा आनंद लुटत गणरायाच्या आगमनाचा जल्लोष केला. पंचवटी, द्वारका, मुंबईनाका, इंदिरानगर,नविन नाशिक, रविवार कारंजा, नाशिकरोड, सातपूर सह उपनगरांमध्ये गणपती बाप्पांच्या उत्सवाची लगबग दिसून आली. घरोघरी गणेशाच्या मूर्तींचे आगमन सुरू होते. लहान मुलांनी गणपती बाप्पा मोरया असे नाव लिहलेल्या टोप्या घातल्या होत्या.

- Advertisement -

अनेकांनी भगव्या रंगाच्या पट्ट्या डोक्याला बांधल्या होत्या. कुणी आपल्या दुचाकीवर, तर कुणी चारचाकीतून बाप्पांना घरी नेत होते. गणरायाच्या षोडोपचारे प्रतिष्ठाना करण्यासाठी दोन दिवसांपासून पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठामध्ये गर्दी पाहायला मिळाली. तर आजही खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नाशिककरांनी गर्दी केली होती. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच शहरातील कार्यालये, दुकाने आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करण्यात आली. ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई-चौघड्याच्या निनादात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात आल्या.

नाशिक नगरी दुमदुमली 

बाजारात खरेदीसाठी उडालेली झुंबड, हलवायाच्या दुकानात मोदक आणि लाडुसाठी लागलेल्या रांगा, रस्त्यांवर कमानी उभारण्यात येउन करण्यात आलेली विद्युत रोषणाई, श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी मूर्तीकारांच्या कारखान्यांमध्ये आणि स्टॉल्सवर सुरू असलेली लगबग, गर्दी आणि सळसळता उत्साह अशा चैतन्यदायी, उत्साही वातावरणामुळे अवघे शहर गणेशभक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले. शहरातील कोपरा न कोपरा मंगलमय बनला. आसमंत ढोल ताशांच्या निनादाने दणाणून गेला. गणपत्ती बाप्पा.. मोरया…, एक दोन तीन चार.. गणपतीची जयजयकार… अशा घोषणांनी नाशिक नगरी दुमदुमली. कोणी रिक्षातून, कोणी पायी तर कोणी कारमधून गणरायाला घरी नेत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -