नाशिकचा लौकिक वाढविणारा ‘भद्रकाली परिसर’

नाशिक गावाची ग्रामदेवता श्री भद्रकाली आहे. श्री भद्रकाली हे नऊ दुर्गेचे प्राचीन स्थान आहे. मार्कंडेय पुराणात उल्लेख असलेली दाक्षियानी देवीचे चिबुटी (हनुवटी) या नावाने प्राचीन कथेत ही देवता ओळखली जाते. जुन्या गढीच्या जागेत असलेल्या मंदिरातील मूर्ती डिंगरटेक भागात होती. पूर्वी डिंगरटेक व म्हसरूळटेक हा रानसावरीने व्यापलेला निर्जन भाग होता. तेथे सापडलेली मूर्ती म्हसरूळ टेक तिवंधा या भागात कौलारू घरांसारख्या (वाड्यातील) जागेत ठेवण्यात आली. त्याठिकाणी पूर्वी संन्यासी राहत असत व धर्माचा प्रचार करीत असत. पेशवेकाळात १७९० मध्ये गणपतराव दीक्षित पटवर्धन यांनी दगडी पायर्‍या बांधून प्रशस्त घरासारखे बांधकाम करून जीर्णोद्धार करून मंदिर बांधले. प्रवेशद्वारातून आत जाताना अर्ध्या भागात चौक व अर्ध्या भागात सभामंडप आणि उंच ओट्यावर नऊ देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. वर्षाकाठी देखभाल व पूजाअर्चेसाठी अडीचशे रूपयांचे वर्षासन होते. भद्रकाली मातेची सुमारे एक फूट उंचीची तांब्याची मुख मूर्ती आणि मूर्तीच्या चार बाजुला चार मूर्ती, या मूर्तीच्या पायालगत एक फूट उंचीच्या चार मूर्ती, अशी ही नऊ देवतांची श्री भद्रकाली ग्रामदेवता आहे. महिलांसाठी वरील मजल्यावर सभामंडपाच्या वरील जागेत सज्जा बांधण्यात आलेला आहे. पूर्वी सहस्त्र भोजनाचा कार्यक्रम मंदिरात होत असे. ग्रामदेवतेच्या मंदिरात साक्ष ठेवून अनेक वादविवाद झाले.

 शंकराचार्यांच्या व वेदशास्त्र पंडितांच्या तर्ककर्कश तत्त्व चर्चा झाल्या. संत सज्जनांना गौरविण्यात आले. लोकमान्य टिळकांना पानसुपारी देऊन त्यांचा गौरव समारंभ (तथापि गैरहजेरीत) झाला. धर्म व देशाचे समरप्रसंगी वीर सावरकरांनी स्फूर्तिदायक विचारांची प्रेरणा दिली. ब्रिटीशांचे नाशिक गावातील रेल्वे स्थानक, भूतपूर्व नाशिक नगरपालिकेने प्रथमत: नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या आखलेल्या योजनेस विरोध करण्यासाठी ब्रह्मवृंदांनी केलेल्या विरोधाची, बहिष्काराची सभा तिवंध्यात झाली. १९१९ मध्ये पहिले कीर्तन संमेलन नाशिकला आले. १९५० च्या न्यास कायद्यानुसार विश्वस्त म्हणन सरदार अण्णासाहेब देशपांडे, गोविंदराव शौचे, श्रीधरशास्त्री वारे, लक्ष्मण ठाकरे, सोमनाथशास्त्री वैद्य, बापूकाका शिंगणे यांनी कार्यभार स्वीकारला. अखंडित कीर्तनमाला, जप, तप, प्रवचने, पुराण, कथा, नित्य अभिषेक, पूजाअर्चा व नवरात्र उत्साहात सुरू केले. प्रसिध्द नारायणराव दीक्षित यांच्या कार्यकाळात चांदीचा मोठा आकर्षक देव्हारा तयार करण्यात आला. संस्कृत पाठशाळा व प्रांगणात नवीन छोटे गणेश मंदिर आणि बाजूला दत्तमंदिर बांधण्यात आले, तसेच हे भद्रकाली मंदिर पूर्वी कौलारू होते. त्यामुळे या मंदिरास कळस नाही. या मंदिरात दरवर्षी पंचांगवाटप केले जाते. हरिष लोणारी, प्रवीण वाणी, माधव निमकर, सोमनाथ कोळपकर, राजाभाऊ संगमणेकर, नारायण जाधव, मुकूंद भालेराव, विनोद आंबाडकर, बाळासाहेब जातेगावकर, राजेंद्र काटे, मराठे या कार्यकर्त्यांनी शनैश्वर मंदिराच्या मूळ मूर्तीस नवीन आकर्षक स्वरूप दिले.

उत्सव काळात निरनिराळी व्याख्याने, कथा, कीर्तन-प्रवचनांच्या कार्यक्रमांची प्रथा सुरू केली. मंदिरासमोरील जागा अरूंद होती. तेव्हा नगरपालिकेने ती जागा रुंद केली. १९१५ मध्ये वासदा संस्थानचे राजे प्रतापसिंह यांच्या स्मरणार्थ सुंदर कारंजे बांधण्यात आले होते. ते पदे भद्रकाली कारंजा या नावानेच प्रसिध्द झाले. माधव निमकर, राजेंद्र काटे , हरिष लोणारी, संजय रत्नपारखी, रमेश जाधव, अनिल शिंदे, राजेंद्र कुलथे, दिलीप कहाणे यांनी आपल्या अथक प्रयत्नांद्वारे सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सुप्रसिध्द कलावंत सोनवणे यांनी घडविलेली साक्षी गणपतीची भव्य व आकर्षक मूर्ती असलेले भव्य मंदिर कारंजाच्या जागेत उभारले. नाशिकच्या श्री साक्षी गणेशाची प्रसिध्दी राज्यात अति दूरवर पसरली आहे. चतुर्थीचा सोहळा अत्यंत प्रसन्न वातावरणात साजरा होतो.

सरदार हिंगणे हे दिल्लीच्या बादशहाकडे पेशव्यांचे वकील म्हणून होते. पेशावरकडील लोक क्रिया-कर्म करण्यासाठी नाशिकला येत. मुस्लिम संस्कृतीच्या प्रभावामुळे तेथील हिंदू लोकांमध्ये उर्दू भाषा प्रचलित होती. हिंगणे हे या मंडळींचे क्रियाकर्म करीत असत. त्याचप्रमाणे पेशवे घराण्यातील मंडळी नाशिकला हिंगण्यांकडे उतरत असत. हिंगणे विद्वान वैदिक पंडित असल्याकारणाने पेशव्यांनी त्यांना वकील म्हणून नियुक्त केले होते. दिल्लीत त्यांच्यासाठी देवडी बांधून दिली होती. एका विशेष दिवशी हिंगण्यांनी पेशव्यांना जेवायला बोलावले असता, त्यांच्या पानापुढे खर्‍या मोत्याच्या रांगोळ्या घातल्या व पायात सोन्याच्या खडावा घालून त्यांचे स्वागत केले होते. या हिंगण्यांचा वाडा भद्रकालीपासून गाडगे महाराज धर्मशाळेपर्यंत पसरलेला होता. त्यांच्या कलात्मक वाड्याची मेघडंबरी रशियातील मॉस्को येथील वस्तुसंग्रहालयात आहे. आजदेखील अनेक पर्यटक नाव दरवाजा भागातील नक्षीकाम पाहण्यासाठी वाड्यास आवर्जुन भेट देतात. कोरीव कामाचे नमुने लंडन म्युझियममध्ये आहेत.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)