कृषीमाल निर्यात प्रोत्साहनासाठी मार्गदर्शन करण्याचे भारती पवारांचे निर्देश

कृषी उडान योजनेचा घेतला आढावा

नाशिक : जिल्हा कृषी उत्पादनात अग्रेसर असल्याने कृषी उडान योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गाव्दारे शेतमालास जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने कृषी विभाग व जिल्हयातील शेतमाल उत्पादक कंपन्यांनी कृषी उडान योजनेबाबत मार्गदर्शन करून एकत्रितपणे मागणी असलेल्या प्रदेशात व देशात उत्पादन निर्यातीसाठी हवाई मार्ग निश्चित करावे, असे निर्देश केंद्रिय आरोग्यरा ज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

कृषी उडान योजनेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पवार या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. या बैठकीला नाशिक येथून जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक कैलास निकम, आत्माचे प्रकल्प संचालक आर.एस. निकम उपस्थित होते. यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, नाशिक जिल्हा कृषि उत्पादनात अग्रेसर असल्याने कृषी उडान योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गाद्वारे शेतमालास जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने कृषि विभाग व जिल्ह्यातील शेतमाल उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे मागणी असलेल्या प्रदेशात व देशात उत्पादन निर्यातीसाठी हवाई मार्ग निश्चित करावेत. जेणेकरून जिल्ह्यात उत्पादित झालेला दर्जेदार व ताजा शेतमाल वेळेत हवाई मार्गाने आवश्यक स्थळी पोहचविणे शक्य होईल. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकरी व शेतमाल उत्पादक कंपन्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बैठकीला नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, पुणे कृषी आयुक्तालयाचे संचालक डॉ. के. पी. मोते, पणन महामंडळाचे चंद्रशेखर बारी, जिल्हा पणन अधिकारी बी.पी देशमुख, नाशिक एअरपोर्ट कार्गो वाहतूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बंजन, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे दुरदृष्यप्राणालीद्वारे उपस्थित होते.