गंगेत मृतदेह आढळून आले की सत्य परिस्थिती समोर येते

उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीत कोविड नियमांच्या उल्लंघनप्रकरणी भुजबळांचा टोला

ncp leader chhagan bhujbal

नाशिक : देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असतांना दुसरीकडे मात्र पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या प्रचार सभांमधून कोरोना नियमावलीचे उल्लंघन होत आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी याबाबत काय बोलणार, सरकारने सर्व परिस्थितीचा विचार करावा. नंतर मग गंगा किनारी मृतदेह आढळून आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येते, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लाखोंच्या सभा झाल्यात, या सभेत नियमांची पायमल्ली झाल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात याबाबत मला बोलण्याचा अधिकार नाही. सरकारने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

भाजप आयटी सेलचे प्रमुख गजारिआ यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून पालकमंत्री भुजबळ यांनी भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांना खडेबोल सुनावत ही भारतीय संस्कृती नसून महिलांबाबत बोलताना काळजी घ्यावी, असा सल्ला सर्वपक्षीय नेत्यांना दिला. कुणाच्या बद्दल अपमानास्पद बोलू नये. बोलताना ती काळजी घ्यावी.

महिलांच्या संदर्भात तर बोलताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागपूर येथील संघ हेडक्वार्टरची रेकी करणार्‍या पाकिस्तानी हेरला ताब्यात घेतल्याबाबत बोलताना संघ मुख्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे व प्रत्येक व्यक्तीची सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असेही ते म्हणाले.