Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुसे, महाजन यांच्यात चुरस

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुसे, महाजन यांच्यात चुरस

Subscribe

नाशिक : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात मंगळवारी (दि.९) १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप देत पाच मंत्रीपदे देण्यात आली आहे. मंत्रीमंडळाचे खातेवाटप बाकी असले तरी, आता नाशिकचा पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता कायम आहे. पहिल्या टप्प्यात शिंदेगटाचे दादा भुसे तर भाजपकडून गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळात सामावेश करण्यात आल्याने आता नाशिकचे पालकमंत्रीपदासाठी भुसे, महाजनांमध्ये चुरस दिसून येत आहे.
भाजप सरकार असताना तत्कालीन जलसंधारणमंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते.

महाजन यांच्या कार्यकाळामध्ये पक्षाची व्यवस्थितपणे बांधणी झाली होती. नाशिक महापालिकेसह नगरपालिका व जिल्हा परिषदेमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाजन यांचा नाशिकशी कनेक्ट तुटला. त्यानंतर माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकचा कार्यभार देण्यात आला. आता राज्यात पुन्हा भाजप व सेनेची सत्ता आल्याने नाशिकच्या पालकमंत्री पदावर कोण विराजमान होणार याबाबतदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता पक्ष बांधणी तसेच सत्ता आणण्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे नाशिकवर पकड मजबूत करण्यासाठी पालकमंत्री पददेखील भाजपकडे येण्याची दाट शक्यता आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविण्याची मागणी भाजपमधून होत आहे.

- Advertisement -

नाशिक हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिंदे यांच्या बंडात नाशिकमधून आमदार सुहास कांदे, आमदार दादा भुसे यांनी बंड केले. काही दिवसांपूर्वीच शिवसेना कार्यकारिणीत बदल करत कांदे, भुसेंना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला. तर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेव्दारे बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेतल्या. अर्थात आदित्य यांनी मालेगाव मतदारासंघात सभा घेतली नाही. याकरीता सोमवारपासून ते पुन्हा नाशिक दौर्‍यावर येणार होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला. परंतु, शिवसेनेला शह देण्यासाठी भुसेंना पालकमंत्रीपद देत धक्कातंत्र वापरले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -