१२ तासांत सायकल चोर जेरबंद

ओझर : टाऊनशिप येथील एका वाहन बाजारासमोरून सायकल चोरी करणार्‍या दोघा सायकल चोरट्यांना ओझर पोलिसांनी 12 तासात मुद्देमालासह पकडुन अटक केली. सोमवारी सांयकाळी 7 ते बुधवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मनोज हिरालाल कुंभार, रा. संभाजी चौक, ओझर यांची एक लाल रंगाची कांद्रा कंपनीची सहा हजार रुपये किमतीची रेंजर सायकल ही अज्ञात चोरट्यांनी मुंबई-आग्रा हायवेलगत असलेल्या वैष्णव वाहनबाजारा समोरून चोरून नेली असल्याची तक्रार कुंभार यांनी बुधवारी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यातील आरोपीचे व चोरीस गेलेल्या सायकलचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक रहाटे यांनी ओझर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार किशोर अहिरराव, दीपक गुंजाळ व अनुपम जाधव यांना आदेश दिला असता गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी व आजुबाजुस असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन फुटेजमध्ये दिसत असलेले संशयीत इसम सायखेडा फाटा परिसरात चोरी केलेल्या सायकलसह फिरत आहेत अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने बुधवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास गुन्ह्यातील संशयीत इसम हे सायकलसह जात असतांना त्यांना गुन्हे शोधपथकाने सायखेडा फाटा परिसरात ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव संजय बाळु दिवे, कोकणगाव व समाधान तुकाराम उपडे रा.कोकणगांव असे सांगितले.

त्यांचे ताब्यातील रेंजर सायकलबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तेंव्हा त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदरची सायकल ही वैष्णव बाजार ओझर याचे समोरुन रात्री चोरली असल्याने सांगितले. नंतर सहा हजार रुपये किंमतीची सायकल व संशयीत आरोपी यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणून त्यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.