मोठा निर्णय : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना नोकरी

आमदार किशोर दराडेंच्या शिक्षक दरबारात निर्णय; प्रलंबित प्रश्नही सुटणार

Kishor Darade Teachers meeting
मोठा निर्णय : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना नोकरी

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. या आदेशाच्या आधारे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वारसांना त्वरित शासकीय नोकरी देण्याचे आदेश नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षण विभागाला दिले.

आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २३) गंगापूर रोडवरील सीएमसीएस महाविद्यालयात शिक्षक दरबार पार पडला. यावेळी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांसह मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांपैकी शिक्षण सेवकांचे सहा, कनिष्ठ लिपिक पाच, प्रयोगशाळा सहायक एक, शिपाई २८ जागांसाठी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यात शिपाई पदे भरण्यासंदर्भात शासनादेश महिन्याभरात येण्याची शक्यता असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांनी सांगितले.

विधायक कार्यसमिती सटाणा या संस्थेतील ३९ शिक्षकांना सेवा सातत्य व १२ वर्षापासून प्रलंबित असलेले वेतन मिळावे, यासाठी शिक्षकांनी कळकळीची विनंती केली. अनेक प्रयत्न करुन आम्ही शालार्थ आयडी मिळवला तरी आमचे वेतन सुरु होत नाही. येत्या १५ दिवसांत आमचे वेतन सुरु झाले नाही तर १६ व्या दिवशी सर्व शिक्षक शिक्षण विभागासमोर आंदोलन करतील, असा इशारा या शिक्षकांनी दिला. तसेच अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षकांकडून काही संस्था एका महिन्याचा पगार सक्तिने काढून घेत असल्याचा प्रकारही समोर आला. या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षकांनी या दरबारात केली. शिक्षकांनी केलेल्या मागण्या पुढील सभेपूर्वी मार्गी लावण्याचे आदेश आमदार दराडे यांनी दिले. तसेच शिक्षण विभागाच्या पातळीवरील विषय त्यांनी जागेवरच मार्गी लावले. शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही आमदारांना दिले.

बैठकीतील महत्वपूर्ण घडामोडी

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षण संस्था पैशांची मागणी करत असल्याचा आरोप वेतनश्रेणीपुर्व प्रशिक्षणासाठी २ हजार रु. शुल्काविषयी नाराजी २२ वर्षांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत असलेल्या कला शिक्षकाला महिन्याभरात मिळणार वेतन माजी शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील यांनी ४ महिन्यांत एकही प्रस्ताव निकाली न काढल्याचा आरोप विनाअनुदानित ते अनुदानितचे प्रस्ताव ३ आठवड्यांत पूर्ण करणार इंग्रजी माध्यम शाळांमधील शिक्षकांच्या समस्यांसाठी कॅम्प घेणार १२ कोटींची वैद्यकीय बीले प्राप्त; परंतु, ऑफलाईन परवानगी नाही