कोट्यवधींनी बहरलेली फुले देवीच्या स्पर्शाविनाच मरगळली

गुलशनाबाद रुखेरुखे; कोरोनाने केले सुकेसुके

unseasonal rain hit flower market
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये पडला फुलांचा खच

नाशिक : फुलांशिवाय देवपूजा कशी होईल, असा प्रश्न कधीकाळी पडत होता. आता मात्र फुलांविनाच देवीची पूजा करावी लागतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे विविध मंदिर परिसरात फुले विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मंदिरात फुले नेण्यास बंदी असल्याने फुल विक्रेते हातावर हात धरुन आहेत. राज्यभर अशीच परिस्थितीती आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ऐन नवरात्रोत्सव काळात ठप्प झाली आहे. एकेकाळी फुलांचे शहर म्हणजे गुलशनाबाद म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधून राज्यभर फुलांची निर्यात होते. यंदा मात्र कोरोनाच्या नियमांमुळे असंख्य फुल उत्पादकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या पावणेदोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने फुल विक्रेत्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घटस्थापनेला मंदिर उघडण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर विक्रेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र कोरोनाचे निर्बंध जाहिर होताच विक्रेत्यांचा उत्साह पून्हा मावळला आहे. या निर्बंधानुसार मंदिरात फुले, फळे वा पूजा साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फुलांचा सिझन असतानाही त्यांची विक्री व्यावसायिकांना करता येत नाही. महत्वाचे म्हणजे, फुलांचा व्यवसाय ठप्प झाल्याने ही झाडे टिकविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. फुलांची झाडे टिकवली नाही तर ती झाडे मरून जाण्याची भीती असते. त्यामुळे ही झाडे टिकविण्यासाठी कीटकनाशकांचा खर्च, शेतात काम करणार्‍या मजुरांचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर येत आहे. मात्र व्यवहार ठप्प झाल्याने मजुरांची मजुरी न परवडणारी असून स्वतःच्या खिशातून ही मजुरी सध्या शेतकर्‍यांना द्यावी लागत आहे. त्यातच टाळेबंदी होण्याच्या आधी शेतमाल दिलेल्या व्यापार्‍यांकडे त्या मालाचे पैसेदेखील अडकून पडले आहेत. त्यामुळे हा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
कोरोनापूर्वी फुलांच्या बाजारात जेव्हा फेरफटका मारला जायचा तेव्हा नाशिक ही फुलांची राजधानी असल्याची जाणीव व्हायची. नाशिकमध्ये सीझनमध्ये झेंडू, गुलाब, गेलाडा, गुलछडी, लिली, जरबेरा ही फुले उपलब्ध होतात. तर मोगरा, कागडा, शेवंती ही फुले ऋतूमानानुसार उपलब्ध होतात. गुजरात, बंगळुरू, इंदूर या भागातून नाशिकच्या गुलाबाला अधिक मागणी असायची. झेंडूच्या दररोज पन्नास ट्रक फुले मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यात पोहचायच्या. नवरात्रोत्सवात ७० ते ८० रुपये किलो या दराने झेंडूची फुले विकली जात. एक ट्रक फुलांची किंमत एक लाख रुपयांपर्यंत पोहचते. पन्नास ट्रकचा हिशेब विचारात घेतला तरी पन्नास लाखांची उलाढाल झेंडूच्या बाजारात होत होती.

मजुरी देणेही मुश्किल

एका मजुराची मजुरी ही दिवसावर असते. त्यामुळे दिवसभराच्या कामानंतर त्याला कामाप्रमाणे २५० ते ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. त्यामुळे आताच्या या हंगामात ही मजुरी न परवडणारी झाली असून व्यवसाय ठप्प झाल्याने स्वतःच्या खिशातून मजुरी द्यावी लागत आहे. तसेच, कीटकनाशकांच्या खर्चातदेखील वाढ झाल्याने महिन्याचे या वेळचे आर्थिक गणित कोलमडले आहे.