युनियनच्या वादातून भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

नाशिकमध्ये एका आठवड्यात तिसरा खून, युनियनच्या वादातून हत्या

bjp leader amol ighe murder
युनियनच्या वादातून भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरू आहे. सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा आज, शुक्रवारी सकाळी खून करण्यात आला. युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या आठवडाभरात हा तिसरा खून आहे.

सातपूर परिसरातील भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे हे शुक्रवारी सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत गेले होते. गेल्या काही दिवसापासून या कंपनीत युनियन स्थापनेवरून दोन युनियनमध्ये वाद सुरू आहेत. इघे यांनी युनियन स्थापन करण्यास दुसऱ्या युनियनच्या प्रमुखासह काही कामगारांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी इघे आज सकाळी कंपनीत गेले होते. यावेळी वाद होऊन त्यांच्यावर सशस्त्र वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ईघे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे इघे सर्वांना परिचित होते. अनेकदा पक्षभेद विसरून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना मदत करत. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबासह परिचितांना मोठा धक्का बसलाय.


हेही वाचा – सिन्नर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ, लाखोंचा ऐवज लुटला