घरमहाराष्ट्रनाशिकपटोलेंविरोधात नाशकात भाजपची तक्रार

पटोलेंविरोधात नाशकात भाजपची तक्रार

Subscribe

मोदींविरोधातील वादग्रस्त विधानामुळे पटोले अडचणीत

नाशिक : मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाला आहे. नाशिक शहरातील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २५ आणि नगरपंचायतच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दरम्यान, लाखनी तालुक्यातील जेवणाळा या गावात नाना पटोले यांनी कार्यकर्ता आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी, ‘मी भांडतो, मी मागील ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॉलेज काढून आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करून टाकतात.

- Advertisement -

मी एवढी वर्षे झाली, राजकारण करतोय, पण एकही शाळा माझ्या नावावर नाही. मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचारास आले, अशा वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पटोले यांच्या या विधानानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक शहर भाजपतर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देत कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनावर शहराध्यक्ष गिरीश पालवेंसह अन्य पदाधिकार्‍यांची स्वाक्षरी आहे.

भाजपतर्फे नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार आली आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. घटना भंडारा जिल्ह्यातील असल्याने शहानिशा करुन पुढील कारवाई केली जाईल.

– साजन सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -