घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात भाजप- मनसे युतीचे पडघम

नाशकात भाजप- मनसे युतीचे पडघम

Subscribe

पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण

पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्याने आता नाशिक महापालिका निवडणुकीतही युती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणे शक्य आहे.महत्वाचे म्हणजे नाशकात महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला होता.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार की नाही याकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यापूर्वी नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला. त्यातच पुण्यात मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली आहे. असे असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची युती पालघरमध्ये झाली आहे. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर नाशकातही युती होण्याची शक्यता आहे.मनसेसह अपक्षांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एक सदस्यीय प्रभाग रचना रद्द करुन तीन सदस्यीय रचनेचा स्वीकार केला आहे. आजच्या घडीला मनसेकडे प्रत्येक प्रभागात तीन सक्षम उमेदवार नाहीत. त्यामुळे तीन सदस्यीय पद्धती मनसेच्या पथ्यावर पडणारी नाही. एक सदस्यीय पद्धती असती तर मात्र मनसेच्या उमेदवारांची संधी वाढणार होती. पण ही संधी मिळू नये म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चाल खेळल्याने राज ठाकरे यांनीही नाराजी वर्तवली. सत्ताधार्‍यांनी निवडणुकीचा पोरखेळ लावला असून त्याविरोधात नागरिकांनीच न्यायालयात जावे असे आवाहनही त्यांनी केले. यावरुन राज यांना एक सदस्यीय प्रभाग रचनेची अपेक्षा होती हे स्पष्ट होते. परंतु निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय पद्धतीची अधिसूचना काढल्यास मनसे भाजपबरोबर निवडणूक लढवू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

परप्रांतियांचा मुद्दा ठरु शकतो अडथळा

मनसे आणि भाजप युती होण्यास परप्रांतियांचा मुद्दा अडथळा ठरत आहे. मनसेने परप्रांतियांना हटवण्याच्या मुद्यावरच पक्षवाढ केली आहे. तर भाजप मात्र परप्रांतियांच्या पाठीशी उभा आहे. जोपर्यंत मनसे परप्रांतियांचा मुद्दा मागे घेत नाही तोपर्यंत भाजप मनसेबरोबर युती करणार नाही असे काही महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. अर्थात गेल्या काही महिन्यांपासून मनसेने परप्रांतियांच्या मुद्यावर फारशी आक्रमक भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे मनसेनेही दोन वर्षापूर्वी पक्षाच्या झेंडा भगवा रंगाचा करुन हिंदूत्ववादाला अंगीकारले आहे.

मनसे- भाजप युती का होऊ शकते?

  • दोन्ही पक्ष हिंदूत्ववादी आहेत तीन सदस्यीय रचनेमुळे मनसेला भक्कम आधाराची गरज आहे
  • महाविकास आघाडीतील तीन पक्षांना टक्कर देण्यासाठी भाजपलाही मनसेची गरज
  • शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला मनसेची होणार मदत
  • भाजप नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनाही मनसेप्रती ‘सॉफ्ट कॉर्नर’
  • राज ठाकरे यांची भूमिका महाविकास आघाडीच्या विरोधातील; भाजपबाबत अनेक महिन्यांपासून तोंडावर बोट
  • पुण्यातील मनसे पदाधिकार्‍यांनी युतीचा धरला आग्रह
  • मनसेच्या सत्ताकाळात पहिल्या टर्ममध्ये भाजप आणि मनसेची होती युती
  • नाशकात दीड वर्षापूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीवेळी मनसेने भाजपसाठी बजावले होते व्हिप
  • स्थायी समिती निवडणुकीतही भाजपला दिली होती मनसेने टाळी
  • नाशकातही मनसेचे पदाधिकारी युतीसाठी उत्सूक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -