घरमहाराष्ट्रनाशिकअमित शहा प्रियकर तर उध्दव ठाकरे प्रेयसी; युती होणारच : प्रकाश आंबेडकर

अमित शहा प्रियकर तर उध्दव ठाकरे प्रेयसी; युती होणारच : प्रकाश आंबेडकर

Subscribe

शिवसेना आणि भाजप हे पक्ष कितीही भांडणाचा देखावा करीत असले तरी त्यांची युती होणारच आहे असे स्पष्ट करीत अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, युती करण्याशिवाय या दोन्ही पक्षांना गत्यंतर नाही. निवडणूका समोर ठेऊन आता भाजप सरकार अनेक आश्वासने देत आहे.

भाजप आणि शिवसेनेची अवस्था प्रियकर आणि प्रेयसी सारखी आहे. यातील प्रियकर अमित शहा आहेत. तर प्रेयसी उध्दव ठाकरे आहेत. प्रेयसी खुष झाली की युती झालीच समजा अशी कोपरखळी भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी मारली. नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी (दि. १३) झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. यावेळी प्रथमच भारिप आणि एमआयएमचे नेते एका व्यासपीठावर आल्याने आगामी निवडणुकीत हे तिसर्‍या आघाडीचे संकेत मानले गेले.

दहा टक्के आरक्षणाची भाषा करणार्‍या गेम चेंजरचा गेम करा

सवर्णांच्या आरक्षणाला राज्यसभेत विरोध केला जाईल या अपेक्षेने भाजप सरकारने हे विधेयक मांडले होते. जर विधेयकास विरोध झाला असता तर भाजपला निवडणुकीत प्रचारासाठी मुद्दा मिळाला असता. आता तोही मंजुर झाल्यामुळे आता त्यांची परिस्थिती आ बैल मुझे मार अशी झाली आहे. आर्थिक दृष्ठ्या मागासलेला सवर्ण, ज्यात मुस्लिम समाज येतो. व्यापार, शिक्षण क्षेत्र, शासनातील अधिकारी यांची आकडेवारी काढली तर ते या आरक्षणातून बाद होतात. कारण हजार फुटाखाली त्यांचे फ्लॅट नाहीत. आठ लाखांवर उत्पन्न असलेलेच सर्वच आरक्षणाच्या बाहेर आहेत. हजार चौरस फुटांच्या आत बहुतांश मुस्लिमांची घरे आहेत, आठ लाखांच्या आत उत्पन्न आहे. त्यामुळे याचा फायदा मुस्लिमांनाच होणार होता. पण असे आरक्षण मिळूच शकत नाही. आम्ही निर्बूध्द आहोत असे सरकारला वाटले असेल. केवळ मते मागण्यासाठीच दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. गेम चेंजरची भूमिका वठविण्यासाठी जे आरक्षण मिळणार नाही, ते देण्याची भाषा करणार्‍या भाजपचा गेम केल्याशिवाय मतदार आता राहणार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

मोदींना चहा विकायला तर अमीत शहांना भजी तळायला पाठवा

या सभेत प्रथमच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे एका व्यासपीठावर आले होते. आ. इम्तियाज यांनी एमआयएम पक्ष आंबेडकरांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा असून २०१९मध्ये निळा, हिरवा आणि पिवळा झेंडेधारी विधानसभेचे शिखर पादाक्रांत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे कबुल केले होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर आता दोन नोकर्‍यांच्या जागा राखून ठेवाव्या लागतील. मोदी यांना चहा विकायला तर अमीत शहा यांना भजी तळायला पाठवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

MIM Jalil
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याशी गुफ्तगू करताना भारिपचे प्रकाश आंबेडकर.

डॉ. प्रकाश आंबेडकर उवाच

  • दंगल घडविण्याचे या सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न फसले म्हणून आरक्षणाचा मुद्दा काढला.
  • नोटबंदीमुळे काळापैसा बाहेर आलाच नाही; उलट मोदी सरकार विदेशी कंपन्यांना ब्लॅकमेल झाले
  • अमेरीकन कंपन्यांचे डेबीट व क्रेडीट कार्डचा वापर वाढवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय
  • दोन हजारांच्या नोटा कमी करण्यामागे या कंपन्यांचा मोदींवर दबाव
  • हिंदु राष्ट्र बनविण्याच्या नादात देशाला बडवू नका
  • राफेल विमान खरेदीत ३६ हजार कोटींचा घोटाळा
  • विमान वापरात येण्याविषयी फ्रान्ससोबत कोणताही करार न केल्यामुळे संरक्षण खात्यासोबत भाजपचा सर्वात मोठा खिळवाड केला
  • काँग्रेसला मुस्लीम समाजाची मते चालतात पण, नेते चालत नाही
  • महाराष्ट्रात मराठ्यांची नाही तर १६९ कुटुंबांची सत्ता आहे
  • प्रत्येक आमदार, खासदार, जिल्हा परिषदेत एकमेकांचे नातेवाइक सत्तेवर बसले आहेत
  • मराठ्यांच्या मावळ्यांना सत्तेत कोठेही स्थान नाही
  • ‘भिक्षा’ मागणार्‍यांचे हे सरकार असल्यामुळे दुष्काळाचे नियोजन होऊ शकले नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -