भाजपनं मन मोठं करावं, शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावं

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नवा फॉर्म्युला

Ramdas Athavale warned RPI will agitate during the convention for reservation demands

नाशिक : काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर द्यावी, असा सल्ला रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मित्रपक्ष भाजपला दिला.
शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी (दि.१०) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दोन्ही पक्षांनी पुन्हा युती करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. पण निकालानंतर आकडे आले तेव्हा आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, हे लक्षात आल्यवर सेनेने मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फार्म्युला भाजपने फेटाळला. भाजपला विश्वास होता, काँग्रेस पाठिंबा देणार नाही आणि त्यांचा तो अंदाज चुकला व सेनेने दोन्ही काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. पण सेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यास ते युती करतील. पण भाजप हा सल्ला ऐकेल की नाही, याबाबत त्यांनी बोलणे टाळले.

उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहे. भीमशक्ती -शिवशक्ती एकत्र आली होती. त्यावेळी राज्यात सत्ता आली. आम्ही म्हणजे भीमशक्ती ज्यांच्यासोबत जातो राज्यात त्यांची सत्ता येते. काँग्रेसला याचा अनुभव आहे. २०१४ मध्ये भाजप सेनेनंही तो घेतला आहे. रिपब्लिकन पक्ष सर्व जातीधर्माचा व्हावा, अशी आमची भूमिका व्हावी.

९ जुलै २०२२ दलित पँथर स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी दलित पँथर बरखास्त करण्यात आली. पुन्हा दलितांच्या संरक्षणासाठी पुन्हा दलित पँथरच पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे का याचा विचार आम्ही गांभीर्याने करत आहोत. दलित पँथर समाजाला जोडण्याचे काम करणार आहे. समाजएकसंघ करण्याची जबाबदारी पँथरची असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्यथा उत्तर प्रदेशात स्वबळावर..

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरपीआयला आठ ते दहा जागा द्याव्यात. युती झाली नाही तर आम्ही आमच स्वबळावर लढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. इतर जागांवर मात्र आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. गोवा निवडणुकीबाबत बोलताना निवडणुका न लढता महामंडळ देण्याचे भाजपने कबूल केले आहे. काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळत नाही. सोनिया गांधी तात्पुरत्या अध्यक्ष आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसने विश्वास गमावलेला आहे. या पाच राज्यात काँग्रेस खिळखिळी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मोडीत काढण्यासाठी नव्हे तर ते संविधान अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सत्तेवर आले आहेत. काँगेेस किंवा विरोधकांकडून जो विरोधी प्रचार केला जातोय त्यात काही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना नेते खा. राऊत यांनी पर्रिकर परिवाराला सेनेत यायचे निमंत्रण दिले याबाबत विचारले असता पर्रिकर यांच्या मुलाला सेनेने ऑफर दिली असली तरी ते सनेकडे जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.