आयटीला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात भाजपचे रेड कार्पेट

दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे आयटी कंपन्यांसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून टाकले जाणार रेड कार्पेट

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी नाशिकमध्ये पोषक वातावरण असल्याने तसेच दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे या क्षेत्रासाठी जागा आरक्षित असल्याने त्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून रेड कार्पेट टाकले जाणार आहे. त्यासाठी शहर तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची माहिती देण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ऑक्टोंबर अखेर किंवा नोव्हेंबर महिन्यात कॉन्फरन्स आयोजित केली जाणार आहे.

मुंबई, पुणे व औरंगाबाद या महत्वाच्या औद्योगिक शहरांपासून नाशिकचे अंतर जवळ आहे. त्याचबरोबर आता सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गामुळे सुरत-नाशिक शहर अवघ्या दोन तासांच्या अंतरावर येणार आहे. नाशिक मधून देशातील महत्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरु झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतं आहे. नव्याने सुरु झालेल्या समृध्दी महामार्गामुळे रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम झाले आहे. परंतु महाराष्ट्रातील औद्योगिक शहरांच्या तुलनेत पायाभूत सुविधा बरोबरीच्या असूनही हवा तसा विकास झालेला नाही. नाशिक मधून मुंबई, पुण्याकडे रोजगारा निमित्त जाणायांची संख्या अधिक असल्याने त्या शहरांच्या पायाभूत सुविधांवर देखील अधिक ताण निर्माण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिक मध्ये माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योगांची संख्या वाढणे गरजेचे आहे.

नाशिक महापालिका ही जिल्ह्यातील आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने मोठी पालकसंस्था असल्याने नाशिकची माहीती देशभरातील आयटी कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याअनुशंगाने आयटी उद्योग स्थापन होण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींना उद्योग स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. हॉटेल ताज येथे एक किंवा दोन दिवसीय कॉन्फरन्स आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला असून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आयटी कंपन्यांच्या सहकार्याने मुंबई, पुणे, चेन्नई, हैद्राबाद, नोएडा, बेंगलुरु आदी सह मोठ्या शहरातील आयटी कंपन्यांना निमंत्रित केले जाणार आहे

satish kulkarniदिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे आयटी उद्योगासाठी जागा आरक्षित करण्यात आली असली तरी अद्याप भूमी अधिग्रहण झालेले नाही. आरक्षित जागा ताब्यात घेवून त्यावर आयटी उद्योग झाल्यास शहर, जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. पायाभूत सुविधांची माहिती देण्यासाठी कॉन्फरन्स आयोजित केली जाणार आहे. .                                                                                       –  सतीश कुलकर्णी, महापौर.