नाशिक जिल्ह्यातील १८ शाळांना टाळे; परवानगीविना होत्या सुरू

नाशिक : शिक्षण विभागाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार्‍या जिल्ह्यातील 18 शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थी व पालकांना या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासही प्रतिबंध करण्याची नोटीस गट शिक्षणाधिकार्‍यांनी बजावली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करुन मान्यता मिळण्यापूर्वीच वर्ग भरवले जातात. नियमबाह्यरित्या शाळा सुरु करुन विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या शाळा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. गट शिक्षणाधिकार्‍यांमार्फत शाळांना नोटीस बजावली आहे. यात बागलाण, त्र्यंबकेश्वरमधील प्रत्येकी तीन, दिंडोरी, इगतपुरी, नांदगावमधील प्रत्येकी एक, तर सिन्नर, निफाड, नाशिक तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळांचा समावेश आहे. कळवण तालुक्यातील तीन शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्यापैकी एक शाळा बंद झाली असून, दोन शाळांची प्रक्रिया प्रस्तावित आहे. बंद झालेल्या शाळांमध्ये जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थांचाही समावेश आहे.

या शाळा झाल्या बंद

अभिनव बालविकास मंदीर निताणे, अभिनव बालविकास मंदिर आैंदाणे, श्यामलाताई बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल मुल्हेर (ता.बागलाण), बुध्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल, दिंडोरी (ता.दिंडोरी), आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल अभोणा, इंग्लिश मिडीयम स्कूल ओतूर, तुळजाभवाणी प्राथमिक विद्यालय अभोणा (ता.कळवण), बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल मनमाड (ता.नांदगाव), शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.सुभाष गुजर प्राथमिक हिंदी मिडियम स्कूल देवळाली कॅम्प, प्राथमिक विद्यामंदिर शिंदे (ता.नाशिक), न्यू गुरुकुल स्कूल चितेगाव, न्यू गुरुकुल स्कूल खेरवाडी (ता.निफाड), रेनबो किड्स मापरवाडीरोड सिन्नर, व्ही. व्ही. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल माळेगाव (ता.सिन्नर), नूतन आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल (ता.इगतपुरी), ब्लुमिंग बर्डे इंग्रजी माध्यम शाळा, मल्हार हिल प्राथमिक शाळा कुरवलपाडा, स्वामी सोयेश्वरानंद गुरुकुल त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर).

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

नियमबाह्यपणे शाळा चालवून संस्थाचालक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने उघडकीस आला आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेवू नये यासाठी शिक्षण विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. तर काही गटशिक्षणाधिकार्‍यांनी या नोटीसा थेट संस्थेच्या प्रवेशद्वारावरच चिपकावल्या आहेत. पालकांनी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्यास ते स्वत: जबाबदार राहतील, असेही या नोटीसांमध्ये म्हटले आहे.