घरताज्या घडामोडीनाशिकहून थेट केरळला विमानाने पाठवले रक्त

नाशिकहून थेट केरळला विमानाने पाठवले रक्त

Subscribe

दुर्मिळ ’पी’ नल गटाची रक्त पिशवी पुरवून वाचवला रुग्णाचा जीव

एखाद्या आजारी व्यक्तीला अमूक एका ब्लड ग्रुप म्हणजेच रक्तगटाचे रक्त हवे असल्याचे मेसेजही अनेकदा फिरतात. मग, संबंधित रक्तगट असणार्‍या व्यक्ती पुढाकार घेऊन रक्तदान करण्यासाठी जातात. मात्र अनेकदा काही रक्तगट असे असतात की, जे सहसा मिळत नाही. अशाच प्रकारचा एक दुर्मिळ रक्तगट म्हणजे ’पी’ नल. केरळमध्ये एका पाच वर्षाच्या बालकाला अपघातामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची गरज भासली. त्याचा रक्तगट ’पी’ नल आढळून आला. संपुर्ण केरळमध्ये या रक्तगटचा व्यक्ती मिळून आला नाही मात्र नाशिकमध्ये हा रक्तगट मिळून आला आणि खास विमानाने ही रक्तपिशवी थेट केरळ पाठविण्यात येउन या बालकाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

कोची येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्येे एका पाच वर्षाच्या बालकाला अपघातामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची गरज भासली. परंतु या रुग्णास कोणत्याही रक्तगटाचे रक्त जुळत नव्हते. रक्ताची चाचणी केल्यानंतर त्या रुग्णाचा रक्तगट हा अतिशय दुर्मिळ गटाचा ’पी’ नल असा आढळून आला. या रक्तगटाचा रक्तदाता हा केरळ राज्यात कोठेही उपलब्ध नसल्याने रुग्णाचा जीव रक्ताअभावी धोक्यात आला होता. सुदैवाने आयसीएमआर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्मुनो हिमाटोलॉजी च्या डॉ. स्वाती कुलकर्णी व एम्स हॉस्पिटलच्या डॉ. विना शीनाँय यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदाता नाशिक जवळील येवला तालुक्यात आढळून आला असता अर्पण रक्तपेढीच्या डॉ. शशिकांत पाटील यांनी सदर रक्तदात्याशी संपर्क साधून दात्यास रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन रक्तदान करण्याचे सुचविले. रक्तदानाचे महत्व पटल्यामुळे सदर रक्तदाता रक्तदान करण्यास तयार झाला. या रक्तदात्यास अर्पण रक्तपेढीने विशेष वाहनाव्दारे आणण्यात आले. रक्तदाना पूर्वी व रक्तदानानंतर च्या महत्त्वाच्या चाचण्या केल्यानंतर सदर रक्तदात्याचे रक्त हे रुग्णाच्या रक्तगटाशी जुळून आल्याचे डॉ. शशिकांत पाटील यांना आढळले. ही रक्त पिशवी केरळ येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल येथे विमानाद्वारे पोहोचवण्यात आली व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. अर्पण रक्तपेढीच्या या कार्याचे व रक्तदात्याचे एम्स हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आभार मानले.

- Advertisement -

’पी’ नल अतिदुर्मिळ असा रक्तगट
कुठल्याही व्यक्तीचे ए , बी, एबी , ओ असे रक्तगट साधारणतः आढळून येतात. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अतिसूक्ष्म रक्तगट जसे की डफी , कीड, केल , पी, आयएन असेही 40 पेक्षा जास्त रक्तगट अस्तित्वात आहेत. या रक्तगटाची चाचणीही करणे कठीण असते. त्यापैकी ’पी’ हा रक्तगट जवळपास सर्व लोकांमध्ये आढळून येतो. परंतु अतिशय तुरळक लोकांमध्ये ’पी’ रक्तगट हा दिसून येत नाही व त्या कारणाने या रक्तगटाला ’पी’ नल दुर्मिळ समजले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -