घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात रक्तपात सुरूच, अंबड एमआयडीसीत पुन्हा खून

नाशकात रक्तपात सुरूच, अंबड एमआयडीसीत पुन्हा खून

Subscribe

तिघा हल्लेखोरांनी भरदिवसा तलवारी, कोयत्याने केला हल्ला

नवीन नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील सीमेन्स कंपनीसमोरच्या आहेर इंजिनिअरिंग कंपनीजवळ तीन अज्ञात हल्लेखोरांनी तलवारी व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात महात्मानगर येथील नंदकुमार आहेर (वय ५०) यांची हत्या झाली. सातत्याने सुरू असलेल्या या खून सत्रामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून नाशिक शहरात खून, लुटमार, हाणामार्‍यांची ही मालिका सुरूच असल्याने नाशकात पोलिसांचा धाक राहिलेलाच नाही, अशी उघड चर्चा आता सुरू झाली आहे. मंगळवारच्या (दि. ७) घटनेत नंदकुमार आहेर हे सकाळी १० वाजेच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील सीमेन्स कंपनीकडून गंगाविहारकडे जात असताना सीमेन्सजवळील आहेर इंजिनिअरिंग कंपनी (एफ १८/२) येथे आपल्या गाडीतून उतरत होते. यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारी व कोयत्याने सपासप वार करून पलायन केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या आहेर यांना कंपनीतील कर्मचार्‍यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला. हल्लेखोरांची माहिती घेऊन शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नाशकातील उद्योजक प्रवीण आहेर यांचे नंदू आहेर हे पुतणे असून, या हत्येमागील कारण पोलीस शोधत आहेत.
या घटनेने औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली असून एकामागे एक होत असलेल्या खुनाच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -