बोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ. निखिल सैंदाणेंची आता उच्च न्यायालयात धाव

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणातील संशयित डॉ.निखील सैंदाणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज नाशिकच्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यात त्यांना दिलासा मिळतो की पुन्हा अर्ज फेटाळला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी मुंबई, पालघर आणि जळगाव जिल्ह्यातील २१ पोलीस अंमलदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज सादर केले होते. या अर्जांमध्ये बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अर्जदार पोलीस अंमलदारांनी त्यांचे नातेवाईकांचे गंभीर आजार असल्याचे बनावट प्रमाणपत्र नाशिक जिल्हा रुग्णालय व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी खगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

संशयित आरोपी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे व डॉ. श्रीवास यांच्यासह धुळ्याच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्कांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने मंगळवारी (दि.२०) डॉ. सैंदाणे व डॉ. श्रीवास यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे या दोघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिवाय, डॉ. सैंदाणे यांचे नाव बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात समोर येताच त्यांना या पदावरुन हटविण्यात आले आहे. शासनाचे आदेश डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याचेही समोर आले आहे. डॉ. सैंदाणे यांच्या वतीने वकिलांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.

किशोर पगारेच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी

बोगस वैद्यकीय प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपीक किशोर मुरलीधर पगारे (वय ५४, रा.व्दारका, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पगारे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. यावर मंगळवारी (दि.२७) प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांनी दिली.