घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ.सैंदाणे अखेर पोलिसांच्या सापळ्यात

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ.सैंदाणे अखेर पोलिसांच्या सापळ्यात

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाले धुळे लोकेशन, सापळा रचून डॉक्टरला नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत घेतले ताब्यात

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात सातपूरमधील प्रभावती हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल सैंदाणे यांच्यासह एका नातेवाईकास मंगळवारी (दि.२७) सायंकाळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खापर (ता.अक्कलकुवा, जि. नंदूरबार) येथून ताब्यात घेतले. ते पोलिसांच्या जाळ्यात आल्याने बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर, कर्मचारी व एजंटाचे धाबे दणाणले आहे. पोलीस चौकशी डॉ. स्वप्निल सैंदाणे यांच्याकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत आणखी धागेदोरे मिळणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नाशिक जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी मुंबई, पालघर आणि जळगाव जिल्ह्यातील २१ पोलीस अंमलदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज सादर केले होते. या अर्जांमध्ये बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अर्जदार पोलीस अंमलदारांनी त्यांचे नातेवाईकांचे गंभीर आजार असल्याचे बनावट प्रमाणपत्र नाशिक जिल्हा रुग्णालय व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी खगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

खासगी हॉस्पिटलमधून कोरोनाकाळात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्जदार पोलिसांना बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. यामध्ये १६ गंभीर आजार व ५ इतर आजारांची प्रमाणपत्र असून, ही सर्व प्रमाणपत्र बोगस असल्याचे तपासात समोर आले आहे. सहजीवन रुग्णालयाच्या नावे अहवाल देणारा व्यवस्थापक संशयित वीरेंद्र यादव याच्याही मागावर नाशिक ग्रामीण पोलीस आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉ. स्वप्निल सैंदाणेंचे कारनामे

  • डॉ. स्वप्निल सैंदाणे यांची बी. ए. एम. एस. ची पदवी असली तरी ते एम. एस. सर्जन असल्याचे दाखवून चार खासगी रुग्णालयांच्या नावे बनावट प्रमाणपत्रे दिली.
  • डॉ. सैंदाणे यांचे एम. एस. सर्जन असल्याचा बनावट शिक्का वैद्यकीय प्रमाणपत्रांवर मारले पोलीस तपासात समोर आले आहेत.
  • कोरोनाकाळात साईछत्र हॉस्पिटलच्या नावे बोगस प्रमाणपत्र देण्यात आली. प्रत्यक्षात हे हॉस्पिटल आता बंदअवस्थेत आहे.
  • बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश करताच डॉ. स्वप्निल सैंदाणे गायब झाला होता.
या हॉस्पिटल्सने दिली बोगस प्रमाणपत्रे
  • स्पंंदन (प्रभावती) हॉस्पिटल, सातपूर
  • साईछत्र हॉस्पिटल, नाशिक
  • गणेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
  • सहजीवन हॉस्पिटल, नवीन नाशिक
किशोर पगारेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बोगस वैद्यकीय प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपीक किशोर मुरलीधर पगारे (वय ५४, रा.व्दारका, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पगारे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. यावर मंगळवारी (दि.२७) प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -