घरमहाराष्ट्रनाशिकआयमा इंडेक्स देणार उद्योगांना बूस्टर डोस

आयमा इंडेक्स देणार उद्योगांना बूस्टर डोस

Subscribe

१८ मार्च रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : नाशिकचे औद्योगिक क्षेत्र विस्तारत असून, नाशिकमध्ये जागतिक कंपन्यांनी व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवावा. या माध्यमातून नाशिकच्या उद्योगांचा विकास होण्याच्या दृष्टीने यंदाच्या आयमा इंडेक्सच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. याकरिता अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या उद्योगांचे प्रमुख या प्रदर्शनात उपस्थित राहणार आहेत. आयमा इंडेक्सच्या माध्यमातून नाशिकच्या उद्योगांना बूस्टर डोस मिळणार असल्याचा विश्वास आयमा इंडेक्सचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला.नाशिकचे औद्योगिक जगत हे केवळ स्थानिक पातळीपुरतेच मर्यादित न राहता येथील उद्योजकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयमातर्फे ‘आयमा इंडेक्स’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ ते २१ मार्च रोजी डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजीत या प्रदर्शनाचे उदघाटन १८ मार्च रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत माहिती देतांना बेळे म्हणाले, प्रदर्शनात विविध कंपन्यांचे सुमारे ३५० स्टॉल्स असणार आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक प्रदर्शन न भरवता यंदा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे. टाचणीपासून विमाने बनविणार्‍या आपल्या शहरात नवीन तंत्रज्ञान येऊ घातले असून, त्यासाठी आयमा इंडेक्स २०२२ हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

 प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व स्टॉल्स बुक झाले आहेत. नाविन्यपूर्ण उत्पादनांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील ४० आणि राज्यातील ३९ बडया उद्योगांतील प्रतिनिधींना या प्रदर्शनात आमंत्रित करण्यात आले आहे.

 ज्याव्दारे नाशिकमधील गुंतवणुक वाढीबरोबरच व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्याबाबत मदत होणार आहे. विविध विषयांवर चर्चासत्रे, बी टू बी मीटचेही आयोजन करण्यात आले असून निश्चित या माध्यमातून नाशिकच्या उद्योगांना चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी आयमाचे सरचिटणीस ललित बूब, आयपीपी वरुण तलवार, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, योगिता आहेर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आयमा इंडेक्सच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल करणार्‍या नाशिकची बलस्थाने, उद्योगांच्या संधी याबाबत सादरीकरण केले जाईल. नाशिकमध्ये मोठया उद्योगांनी गुंतवणूक करावी यादृष्टीने आयमा इंडेक्स महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. चार दिवसांच्या या प्रदर्शनातून मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीबाबतची घोषणा होणार आहे. स्थानिक उद्योजकांना लाभ होणार आहे.
– धनंजय बेळे, चेअरमन, आयमा इंडेक्स

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -