बूस्टर डोस त्रासदायक नाही, मात्र निगराणीत राहा!

वैद्यकीय अधिकार्‍यांचे नियम पालनाचे आवाहन

booster dose

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून ६०९ सेंटरवर बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. हा बूस्टर डोस अजिबातच त्रासदायक नसून केवळ निगराणीत रहाणे आणि त्रिसूत्रींचे पालन करणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय अधिकार्‍यांकडून दिला जात आहे.

नाशकात दोन दिवसांत १६ हजार २६ हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि वयोवृद्धांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. सोमवारी (दि.१०) ४ हजार ५४ व मंगळवारी (दि.११) ११ हजार ९७२ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व शासकीय, महापालिका व खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवारी (दि.१०)पासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे.

नागरिकांचे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर झाल्याने लसीकरणीचा वेग वाढला आहे. खबरदारी म्हणून दोन डोस घेतलेल्यांना देशभरात सोमवारपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकार्‍यांनी बूस्टर डोस घेतले. विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण अधिक आहे.

अशी घ्या काळजी

  • बूस्टर डोस घेतल्यानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीत रहावे.
  • डोस घेतल्यानंतर त्रास झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  • त्रास झाल्यास परस्पर मेडिकलमधून औषधे घेऊ नयेत.
  • डोस घेतल्यानंतरही मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

बूस्टर डोस घेतल्याने कोणालाही त्रास होत नाही. डोस दिल्यानंतर प्रत्येकास अर्धा तास निगराणीखाली ठेवण्यात आले होते. दोन दिवसांत कोणालाही त्रास झाला नाही. डोस घेतल्यानंतर दैनंदिन कामेसुद्धा करता येत आहेत.
– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल