घरमहाराष्ट्रनाशिकपब्जीसाठी घर सोडले, करतो वेटरचे काम

पब्जीसाठी घर सोडले, करतो वेटरचे काम

Subscribe

मोबाइलवर पब्जी गेम खेळू दिला नाही म्हणून नाशिकच्या युवकाने चक्क घर सोडून खानावळीत वेटरचे काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे अखेर पालकांनी मुलासमोर हात टेकवले.

मोबाइलवर पब्जी गेम खेळू दिला नाही म्हणून नाशिकच्या युवकाने चक्क घर सोडून खानावळीत वेटरचे काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा युवक निफाडमधील एका बागायतदार शेतकर्‍याचा मुलगा आहे. मुलाच्या हट्टापुढे पालकांनी हात टेकवत त्याला मोबाइल घेऊन देण्याची तयारी आता दर्शविली आहे.

पब्जी गेमने जगभर थैमान घातले आहे. अँड्रॉईड मोबाईलवर अगदी सहजपणे डाउनलोड होणार्‍या या गेममुळे मुलांचे लक्ष विचलीत होत असल्याचे दिसते. मुलांना पालकांनी काही कामे सांगितली तरीही ते चिडचिड करून त्यास नकार देतात, शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. गेमच्या विरोधात बोलणार्‍या शिक्षकांशी ते उद्धट बोलतात. त्यामुळे पालकांबरोबर शिक्षकांसाठीही आता हे गेम डोकेदुखी ठरत आहेत. निफाड तालुक्यात चार एकर द्राक्ष बाग असलेल्या एका शेतकर्‍याच्या मुलालाही काही महिन्यापूर्वी पब्जी गेमचे वेड लागले. तो महाविद्यालयात जाण्यास नकार देत होता. तसेच अभ्यासाकडे त्याचे लक्ष लागत नव्हते. त्याच्या गुणांवरही परिणाम झाला होता. शिवाय त्यात हिंसक वृत्ती वाढीस लागली होती. त्याला जेवणाखाण्याचेही भान उरत नव्हते. अखेर त्याच्याकडून वडीलांनी मोबाइल हिसकावून घेत फोडून टाकला. याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट घर सोडले आणि नाशिकमध्ये दाखल झाला. येथे त्याने पंडित कॉलनीतील एका खानावळीत वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इकडे आई-वडील मुलाचा शोध घेत होते.

- Advertisement -

खाणावळ चालकाने या मुलाची माहिती घेत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिवाय गोडीत त्याच्याकडून पालकांचा मोबाइल नंबर मिळवला. त्यांचा मुलगा आपल्या खाणावळीत काम करीत असल्याची माहिती खाणावळ चालकाने पालकांना कळवली. आपला मुलगा सुखरूप असल्याचे बघून त्यांचे डोळे भरून आले. मात्र, हा पठ्ठ्या घरी येण्यास तयार होत नव्हता. आई-वडिल रोज त्याची समजूत काढत होते. अखेर त्याने विशिष्ट तारीख देत या तारखेस मोबाइल घेऊन दिल्यास मी घरी येईल, अशी अट घातली. पुत्र प्रेमापोटी आई-वडीलांनी ती मान्यही केली.

मोबाइल देण्यापूर्वी जबाबदारीची जाणीव करुन द्या

पब्जीमुळे मुलांमध्ये वाढलेली हिंसक वृत्तीच्या केसेस आमच्याकडे सातत्याने येत आहेत. किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. या मुलांचा मेंदूचा पुढील भाग फारसा विकसित झालेला नसतो. त्यामुळे त्याला कसे वागावे याचे तारतम्य उरत नाही. तो हट्टी असतो. मुलांच्या हातात मोबाइल देण्यापूर्वी त्याला जबाबदारीची जाणीव करुन द्यावी. लहानपणापासूनच त्याच्यावर, असे संस्कार रुजवणे गरजेचे आहे. गेममुळे कोणी अ‍ॅडीक्ट झाला असेल तर मोबाइल वापरू न देणे हा उपाय होऊ शकत नाही. अशा वेळी एखादा तास मोबाइल वापरू देण्यास पालकांनी परवानगी द्यावी. शक्यतो आपल्यासमोर बसून गेम खेळण्याचा आग्रह धरावा. हळूहळू मुलाचा मोबाइल खेळण्याचा वेळ कमी करून त्याला मैदानी खेळांमध्ये गुंतवावे. – डॉ. उमेष नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -