बहिष्कार: प्रतिनियुक्तीवरुन जिल्हा परिषद स्थायीची सभा तहकूब

खान, देवरेंच्या प्रतिनियुक्तीचे प्रकरण तापले, महिन्यापूर्वी केलेल्या ठरावाची अंमलबजावणीच नाही

ZP_Nashik
जिल्हा परिषद, नाशिक

नाशिक – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्‍यांची बदलीचा ठराव करुनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. १८) आयोजित स्थायी समितीच्या सभेवर सदस्यांनी बहिष्कार टाकला. सदस्यच न आल्यामुळे ही सभा तहकूब करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.

आरोग्य विभागातील भांडार कक्षात औषध निर्माण अधिकारी विजय देवरे व फैय्याज खान यांची अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्ती आहे. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आरोग्य विभागातंर्गत कार्यरत या कर्मचार्‍यांच्या बदलीचा ठराव भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मांडला. या दोन्ही अधिकार्‍यांचे हितसंबंध तयार झाल्यामुळे त्यांचे अनेक औषध कंपन्यांशी लागेबांधे तयार झाल्याचा आरोपही त्यांनी बैठकीत केला होता. त्यावेळी सदस्यांनाही त्यांच्या बदलीसाठी आग्रह धरत, संबंधित अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी केली.

या ठरावाची अमंलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले होते. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने डॉ. कुंभार्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. सदर तक्रारीनंतर देखील प्रशासनाने कार्यवाही केली नाही. ठरावाची अंमलबजावणी केल्याशिवाय स्थायी होऊ देणार नसल्याचे पवित्रादेखील सदस्यांना जाहीर घेतला. असे असतानाही ठरावाची अंमलबजावणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकला आहे.

आरोग्य विभागात या कर्मचार्‍यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. शासकीय कर्मचार्‍यांना नियम सारखे असावे. निनावी तक्रारींच्या आधारे एखाद्या कर्मचार्‍याची तडकाफडकी बदली केली जाते. हे कर्मचारी झेडपीचे जावई आहेत का? त्यांची बदली झाल्याशिवाय स्थायीची सभाच होणार नाही.
– डॉ.आत्माराम कुंभार्डे, गटनेते, भाजप