Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक कोरोनाची नव्हे, धरणांवर पर्यटकांची लाट

कोरोनाची नव्हे, धरणांवर पर्यटकांची लाट

सोशल डिस्टंसिंगसह वीकेंड लॉकडाऊनचे नियम पाण्यात

Related Story

- Advertisement -

नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम पट्ट्यातील कश्यपी धरणावर सनसेटचे दृश्य अन् सभोवतालचा निसर्गरम्य परिसर डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी हे दृश्य नित्याचेच होते. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. यात जमावबंदी, संचारबंदीचे नियम पालनाचे आवाहन केले जात आहे. मात्र, अशा स्थितीतही शहराबाहेरील या कश्यपी धरणासह जिल्ह्यातील अनेक धरणांवर शनिवारी, रविवारीही पर्यटकांच्या गर्दीचा महापूर दिसून आला. यामुळे पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाला आमंत्रण देणार्‍या या गर्दीवर कडक कारवाईची मागणी आता जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

वीकेंड लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळी होणारी तुफान गर्दी टळेल आणि कोरोना संसर्गाचा धोका टळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अशा ठिकाणांवरील गर्दी वाढलीच असून, परिसरातील हॉटेल्स, दुकाने जोरदार सुरू आहेत. यामुळे नियमांवर पाणी फेरले जात असून, मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

धरण परिसरांतील रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. पेठ, नाशिक, हरसूल, देवरगाव, धोंडेगाव, गिरणारे, गुजरात या मार्गाने नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. शनिवार-रविवारी सर्व बंद असतानाही सर्वत्र गर्दी दिसून येत असून, छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्ये आसन व्यवस्थेपेक्षा कितीतरी अधिक पटीने येथे खाद्य, मद्यप्रेमींची गर्दी दिसत आहे. हॉटेलची पार्किंग फुल्ल होत असल्याने, तसेच पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने ग्राहकांना रस्त्यावर वाहने उभी करण्यास सांगितले जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवतेय.
मूळात, काही ग्राहक थेट नदीपात्रातच भोजनाचा, मद्यपानाचा आस्वाद घेत असल्याने दुर्घटनांचीही भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच शहरानजिकच्या काही धरणांवर तरुणांच्या मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडल्याने खबरदारी घेणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र याउलट घडत असल्याने प्रशासनाकडूनच कठोर कारवाईची पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Hiraman Khoskarपाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासनाने या पर्यटकांना वेळीच आवर घातला नाही, तर येथेदेखील वालदेवी धरणावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. अशा दुर्घटना घडू नये म्हणून पाटबंधारे विभाग, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळीच दखल घेऊन या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करून पुढील अनर्थ टाळावा.

                                      – हिरामण खोसकर, आमदार

पोलीस अधीक्षककोरोनाकाळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी आहे. मात्र तरीही बेशिस्तपणे अशा ठिकाणांवर गर्दी करणार्‍या पर्यटकांवर गुन्हे दाखल करत आहोत. वीकेंड लॉकडाऊनमध्ये पर्यटनस्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
– सचिन पाटील,पोलीस अधीक्षक

- Advertisement -